Bihar Assembly Election 2020: बिहारच्या राजकारणात 'पॉस्टर वॉर', नितीश कुमार यांच्या DNA मध्ये गडबड, लालू प्रसाद यादव यांच्यावरील टीकेला प्रत्युत्तर दिल्याची चर्चा
Poster War in Bihar Politics | (Photo Credits-Social Media)

बिहारच्या राजकारणात पोस्टर युद्ध ( Poster War in Bihar Politics) जोरदार पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय जनता दल (RJD) अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्याव कुटुंबावर निशाणा साधणारे पोस्टर झळकले होते. आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यावर निशाणा साधणारे पोस्टर झळकले आहे. विशेष म्हणजे दोन्ही नेत्यांची पोस्टर्स निनावी आहेत. या पस्टर्सवर प्रकाशकाचे नावच नाही. पाटना शहराच्या रस्ते आणि गल्लोगल्ली अशी पोस्टर्स पाहायला मिळत आहे. नितीश यांच्यावर टीका असलेल्या या पोस्टर्सवर नितीश कुमार यांच्या डिएनए (DNA) मध्ये गडबड असल्याचे म्हटले आहे. नितीश यांच्यासोबत या पोस्टर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचीही प्रतिमा आहे. त्यामुळे हे पोस्टर्स आरेडीच्या समर्थकांनी झळकवले असावे अशी चर्चा आहे.

बिहार विधानसभा निवडणूक 2020 अधिकृतपणे जाहीर होण्यापूर्वीच बिहारमध्ये राजकीय रणधुमाळी सुरु झाली आहे. या वेळच्या विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये कोरोना व्हायरस संकटाचे सावट आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सींग पाळत राजकीय पक्ष आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. त्यातूनच हे पोस्टर्स वॉर जन्माला आल्याचे राजकीय अभ्यासक सांगतात. (हेही वाचा, Bihar Assembly Election 2020: बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर पोस्टरच्या माध्यमातून निशाणा, 'बिहारवर भार' म्हणून संबोधले)

काय आहे पोस्टर्सवर?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रतिमा असलेल्या या पोस्टर्सवर काही मजकूरही दिसतो. पंतप्रधान मोदी सांगत आहेत की, नीतीश कुमार यांच्या डीएनएमध्येच गडबड आहे. हे सतत बदलत असतात. त्यांची प्रत्येक गोष्ट कमकूवत असते, (नीतीश कुमार के डीएनए में ही गड़बड है। मारते रहे पलटी, नीतीश की हर बात कच्ची) असे दाखवण्यात आले आहे.

दरम्यान, पाटना शहरांच्या रस्यांवर आणखी काही पोस्टर्स पाहायला मिळतात ज्यावर नितीश कुमार यांची प्रतिमा आहे. यात बिहारच्या जनतेला बोलताना दाखवले आहे की, भाजप तर बिहारच्या जनतेच्या विरोधात बसली होती. तरीही आपण सत्तेत कसे पोहोचलात?

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच लालू प्रसाद यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची प्रतिमा वापरुन एक पोस्टर पाटना शहरात झळकले होते. या पोस्टर्सवर लालू प्रसाद यादव आणि त्यांचा परीवार बिहारवर भार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता या पोस्टरला नीतीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांची प्रतिमा वापरुन प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे.