Bihar Assembly Election 2020: बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर पोस्टरच्या माध्यमातून निशाणा, 'बिहारवर भार' म्हणून संबोधले
Lalu Prasad Yadav Family Targeted Through Posters In Bihar | (Photo Credits-Social Media)

बिहार विधानसभा निवडणूक 2020 (Assembly Election 2020) अद्याप अधिकृत जाहीर झाली नाही. तरी सत्ताधारी संयुक्त जनता दल (Janata Dal United ) , भाजप (BJP) आणि विरोधात असलेल्या राष्ट्रीय जनता दल (RJD), काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांनी प्रचारास सुरुवातही केली आहे. दरम्यान, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच आता 'पोस्टर वॉर' सुद्धा रंगताना पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये एक पोस्टर प्रसिद्ध झळकवण्यात आले आहे. ज्यावर राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) आणि त्यांच्या कुटुंबावर निशाणा साधण्यात आला आहे. 'बिहारवर भार' अशी पंचलाईनही या पोस्टरवर पाहायला मिळते. पाटना शहराच्या रस्त्यांवर लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांची प्रतिमा असलेले एक पोस्टर शनिवारी पाहायला मिळत आहे. या पोस्टरवर लालू प्रसाद यादव, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, यशस्वी यादव आणि त्यांचे बंदू तेजप्रताप यादव यांच्या प्रतिमा आहेत. या पोस्टरची पाटणा आणि बिहारभर जोरदार चर्चा रंगली आहे.

पटनाच्या रस्त्यांच्या बाजूला लावण्यात आलेल्या या पोस्टरवर 'एक असा परिवार, जो आहे बिहारवर भार' असा मथळा पाहायला मिळतो. धक्कादायक असे की या पोस्टरवर लालप्रसाद यादव यांना सर्वात ठळक कैद्याच्या रुपात दाखवण्यात आले आहे. पोस्टरच्या तळाला तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव आणि राबडीदेवी यांचीही प्रतिमा आहे. हे पोस्टर नेमके कुणी झळकवले आहे याबाबत निश्चित माहिती नाही. परंतू, हे पोस्टर संयुक्त जनता दल किंवा भाजपच्या एखाद्या नेत्याने झळकावले असावे किंवा हे पोस्टर झळकावण्यास पाठिंबा दिलेला असावा अशी चर्चा आहे. (हेही वाचा,Bihar Assembly Election 2020: बिहारमध्ये एकूण 240 पैकी 136 आमदार विविध गुन्ह्यात आरोपी )

दरम्यान, या वर्षीच्या सुरुवातीला (जानेवारी 2020) राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दल यांच्यात पोस्टर युद्ध पाहायला मिळाले होते. अद्याप या पोस्टरवर राजद नेत्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. परंतू, बिहारच्या निवडणुकीत पोस्टर वॉर रंगण्याची चिन्हे आहेत.