
सुरत (Surat) शहरातील पुणा परिसरातून मानवी तस्करीचे (Human Trafficking) रॅकेट उघडकीस आले आहे. राजस्थान आणि सूरत पोलिसांनी दहा दिवस छापे टाकून या प्रकरणाचा छडा लावला आहे. तसेच राजस्थानातील खेड्यातून कामासाठी आणलेल्या 125 हून अधिक मुलांनाही मुक्त करण्यात आले आहे. या मुलांना साडी तयार करणाऱ्या कारखान्यात जबरदस्तीने कामास ठेवले असल्याचे, प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने या मुलांना मुक्त केले आहे. राजस्थान-गुजरात सीमेवरील खेड्यातील काही दलाल या मुलांना सुरत येथे आणत असत. इथे या मुलांना साड्यांवर स्टोन लावणे, लेसपट्टी लावणे यांसारखी कामे करवली जात असत.
राजस्थान राज्य बाल संरक्षण हक्क आयोग आणि बचपन बचाओ एनजीओला, राजस्थान-गुजरात सीमेच्या खेड्यातून मानवी तस्करी करत सुरत येथे मुलांना आणल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सानाजिक संस्थांच्या मदतीने पहाटे पाच वाजता सुरतच्या सीताराम सोसायटीवर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना येथे 15 वर्षांपर्यंतची 132 मुले आढळली. इथे मुलांना वाईट परिस्थितीत ठेवण्यात आले होते. बर्याच मुलांना अगदी छोट्या खोलीत ठेवले होते. एकाच खोली राहणे, झोपणे आणि इतर क्रिया चालायच्या, त्यामुळे या लहान खोलीत प्रचंड दुर्गंधी होती. अशाच अवस्थेत मुले इथे राहत होती. (हेही वाचा: शिर्डीमधून का गायब होत आहेत लोक? मानवी तस्करी नाही, तर 'हे' आहे कारण; उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण)
या मुलांना साड्या बनविण्याच्या कारखान्यांमध्ये काम करायला लावले जात होते. पहाटे चार वाजल्यापासून मुलांना कामाला जुंपले जात असे. बचपन बचाओ संघटनेच्या लोकांनीही या कारवाईत भाग घेतला होता. आता या मुलांना दोन बसमधून उदयपूरला आणले गेले आहे. या मुलांपैकी अनेक मुले उदयपूर जिल्ह्यातील विविध भागातील आहेत.