केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पियूष गोयल यांनी आज नवी दिल्लीत 'भारत' ब्रँड अंतर्गत गव्हाच्या पिठाच्या (Bharat Atta) विक्रीसाठी 100 फिरत्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवला. हे पीठ 27.50 रुपये प्रति किलो पेक्षा जास्त नसलेल्या एमआरपीवर उपलब्ध असेल. सामान्य ग्राहकांच्या कल्याणासाठी भारत सरकारने उचललेल्या अनेक पावलांपैकी हे अलीकडील पाऊल आहे. त्यांनी ‘भारत’ ब्रँडच्या गव्हाच्या पिठाची किरकोळ विक्री सुरू केल्याने बाजारात परवडणाऱ्या दरात पुरवठा वाढेल आणि या महत्त्वाच्या खाद्यपदार्थाच्या किमती सतत नियंत्रित ठेवण्यास मदत होईल.
'भारत' आटा केंद्रीय भंडार, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ मर्यादित (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ मर्यादित (एनसीसीएफ) सर्व प्रत्यक्ष आणि फिरत्या विक्री स्थानावर उपलब्ध होईल आणि इतर सहकारी/किरकोळ विक्री केंद्रांमध्ये याचा विस्तार केला जाईल.
यावेळी बोलताना गोयल यांनी सांगितले की, केंद्राच्या हस्तक्षेपामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिरावल्या आहेत. टोमॅटो आणि कांद्याचे भाव कमी करण्यासाठी यापूर्वी विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. याव्यतिरिक्त, केंद्र ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय भांडार, नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून 60 रुपये प्रति किलो भारत डाळ देखील उपलब्ध करून देत आहे. या सर्व प्रयत्नांचा शेतकऱ्यांनाही मोठा फायदा झाल्याचे सांगताना केंद्रामार्फत शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून त्यानंतर तो ग्राहकांना अनुदानित दरात दिला जात असल्याचे गोयल यांनी नमूद केले. केंद्राच्या हस्तक्षेपामुळे विविध वस्तूंच्या किमती स्थिरावल्या आहेत यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, ग्राहकांबरोबरच शेतकऱ्यांना मदत करण्याचा नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन आहे.
केंद्रीय भांडार, नाफेड आणि एनसीसीएफ या 3 एजन्सींकडून कांदे 25 रुपये प्रति किलो दराने विकण्याबरोबरच भारत डाळ (चणा डाळ) 1 किलो पॅकसाठी 60 रुपये प्रति किलो दराने आणि 30 किलो पॅकसाठी 55 रुपये प्रति किलो दराने त्यांच्या प्रत्यक्ष आणि/किंवा किरकोळ दुकानांद्वारे विक्री सुरू करण्यात आली आहे. आता, ‘भारत’ ब्रँडच्या गव्हाच्या पिठाची विक्री सुरू झाल्यामुळे, ग्राहकांना या दुकानांतून पीठ, डाळ आणि कांदे रास्त आणि किफायतशीर किमतीत मिळू शकतील.