गेल्या 70 वर्षांपासून देशातील सर्व न्यायालयात अयोध्या राम जन्मभूमी (Ram Janmabhoomi)-बाबरी मशीद (Babri Masjid) वाद प्रकरणी आज (16 ऑक्टोंबर) शेवटी सुनावणी पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर सुप्रीम कोर्टात हिंदू आणि मुस्लिम पक्षकारांकडून अंतिम युक्तीवाद करण्यात येणार आहे. त्यामुळे अयोध्या प्रकरणाच्या निकालाची आशा वाढेल. राम जन्मभूमी वादामुळे देशाच्या राजकरणात सुद्धा चढउतार पहायला मिळाले आहेत. मात्र आता बऱ्याच दशकानंतर निर्णय लवकरच समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सुप्रीम कोर्टात आज हिंदू पक्षाकडून अंतिम युक्तीवाद केला जाईल. त्यानंतर मुस्लिम पक्षाच्या वकिलाल उत्तर देण्यासाठी एका तासाचा अवधी दिला जाणार आहे. तर हिंदू पक्षाचे वकील सीएस. वैद्यनाथन यांना मत मांडण्यासाठी 45 मिनिटे दिली जाणार आहे. त्याचसोबत हिंदू पक्षकारांच्या अन्य वकिलांना सुद्धा तेवढाच वेळ देऊ करण्यात येणार आहे. नंतर मुस्लिम पक्षाचे वकिल राजीव धवन यांना उत्तर देण्यासाठी 1 तासाचा वेळ दिला जाणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात यावर शेवटचा वाद बुधावरी जरी होणार असेल तरीही गुरुवार पर्यंत हे प्रकरण सुरु राहणार आहे. गुरुवारी मोल्डिंग ऑफ रिलिफ वर अधिक चर्चा होणार आहे. त्यानंतर सुप्रीम कोर्ट पुढील कारवाहीबाबत सांगू शकतात. गेल्या वेळी झालेल्या सुनावणी दरम्यान चीफ जस्टिस रंजन गोगोई यांनी असे म्हटले होते की, राम जन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणावर 18 ऑक्टोंबर पूर्वी सुनावणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कारण अंतिम ठरलेला निर्णय लिहिण्यासाठी जवळजवळ महिन्याभराचा अवधी लागू शकतो. (अयोध्या प्रकरणी निर्णय मुस्लिमांच्या बाजूने लागला तरी, तेथे मशीद उभारणे शक्य आहे का?; अलीगढ मुस्लिम विद्यापिठाचे माजी कुलगुरु जमीरउद्दीन शाह यांचा सवाल)
अयोध्यामधील राम जन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणावर अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून 2010 मध्ये निकाल जाहीर केला होता. त्यावेळी 2.77 एकर जागा सुन्नी वफ्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला यांच्यात समान विभागून देण्यात यावी असे म्हटले होते. दरम्यान आज या प्रकरणी सुनावणी होणार असल्याने अयोध्येत कलम 144 लागू करण्यात आला आहे. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात 13 ऑक्टोंबर कलम 144 लागू करण्यात आला असून तो 10 डिसेंबर पर्यंत कायम राहणार आहे.