Amway Money Laundering Case: अ‍ॅमवे कंपनीची 757 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त
Amway India | (File Image)

नेटवर्क मार्केटिंग (Network Marketing) क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आणि पाठीमागील अनेक वर्षांपासून बाजारात असलेल्या अ‍ॅमवे ( Amway India) कंपनीवर अंमलबजावणी संचालनालय (Directorate of Enforcement) म्हणजेच ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. अ‍ॅम्वे (Amway) कंपनीची तब्बल 757 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. आर्थिक घोटाला केल्याच्या आरोपाखाली ईडीने ही कारवाई केली आहे. कंपनीच्या वेगवेगळ्या पाच कार्यालयांवर ईडीने कारवाई केल्याचे समजते.

अ‍ॅम्वे इंडिया ही कंपनी ग्राहकोपयोगी वस्तू साखळी पद्धतीने विक्री करते. कंपनीचा विस्तार भारतभर आहे. देशातील विविध राज्यांच्या खेडोपाडीही ही कंपनी आपल्या साखळी मार्केटींग पद्धतीने पोहोचली आहे. प्राप्त माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाने कंपनीची 757.77 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. या संपत्तीत तामिळनाडू राज्यातील दिंडिगूल येथील जमीन, कारखाना, यंत्रसामग्री, वाहन, बँक खाते आणि एफडीचा समावेश आहे. त्यातही केवळ जंगम मालमत्ताच सुमारे 411.83 कोटी रुपयांची आहे. कंपनीच्या विविध बँक खात्यातून सुमारे 345.94 कोटी रुपयांची शिल्लख रक्कम तात्पुरती जप्त केली आहे. (हेही वाचा, Eknath Khadse On BJP: आपले 2 मंत्री तुरूंगात गेलेत, आता तरी गृहमंत्रिपदाचा हिसका दाखवा आणि 2-4 भाजप नेत्यांना तुरुंगात पाठवा - एकनाथ खडसे)

आरोप आहे की, अ‍ॅमवे इंडिया ही कंपनी डायरेक्ट सेलिंग मल्टिलेव्हल मार्केटिंग नेटवर्कच्या नावाखाली थेट पिरॅमीड फ्रॉड चालवत आहे. खुल्या बाजारात विक्रीसाठी असलेले प्रतिष्ठीत ब्रँडच्या वस्तुंपेक्षाही अॅमवे कंपनीची उत्पादने अधिक महाग आहेत. या उत्पादनाच्या किमती वाढण्यासाठी कंपनी जुन्या सदस्यांना देत असलेले कमीशन हे मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहे. या प्रकारच्या व्यवसायातून कंपनीने 2002-3ते 2021-22 या काळात सुमारे 27,562 कोटी रुपये कमावले आहेत. प्राप्त माहितीनुसार, अॅमवे कंपनीची होत असलेली चौकशी ही 2011 मधील प्रकरणाशी संबंधीत आहे.