Eknath Khadse On BJP: आपले 2 मंत्री तुरूंगात गेलेत, आता तरी गृहमंत्रिपदाचा हिसका दाखवा आणि 2-4 भाजप नेत्यांना तुरुंगात पाठवा - एकनाथ खडसे
Eknath Khadse | (Photo Credits: Facebook)

Eknath Khadse On BJP: महाविकास आघाडीच्या नेत्यांवर रोज धाडी पडत आहे. महाविकास आघाडीतील दोन मंत्री तुरूंगात गेले आहेत. किमान आता तरी गृहमंत्रिपदाचा हिसका दाखवा आणि 2-4 भाजप नेत्यांना तुरुंगात पाठवा, असं थेट आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाया सुरूचं आहेत. यापार्श्वभूमीवर आता एकनाथ खडसे यांनी एका सभेत भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित होते. या सभेत बोलताना एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी एकनाथ खडसे म्हणाले, 'जे एकेकाळी माझे पाय धरायचे. माझा आशीर्वाद घ्यायचे, ते आज माझ्याविरोधात आणि शरद पवारांविरोधात बोलत आहेत.' (हेही वाचा - 'लाऊडस्पीकरवर बोलण्याऐवजी महागाईबाबत बोला'; आदित्य ठाकरे यांचा काका राज ठाकरेंना टोला)

दरम्यान, गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी अनेक ट्विट करत शरद पवारांवर हिंदुत्वाच्या मुद्यावरून टीका केली होती. खडसे यांनी याचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. एकनाथ खडसे यावेळी म्हणाले की, राज्यात रोज 100 धाडी पडत आहेत. तपास यंत्रणांचा एवढा गैरवापर कधी पाहिला नव्हता. कुणी चुकीचे केले असेल तर त्याला शिक्षा मिळायला हवी, याबाबत आपलं काही मत नाही. परंतु, तपास यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम केले जात आहे, असा आरोपही खडसे यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील 2 मंत्री तुरूंगात गेले आहेत. किमान आता तरी गृहमंत्रिपदाचा हिसका दाखवा आणि 2-4 भाजप नेत्यांना तुरुंगात पाठवा, असं ठोक आवाहन एकनाथ खडसे यांनी सभेदरम्यान केलं आहे.