'लाऊडस्पीकरवर बोलण्याऐवजी महागाईबाबत बोला'; आदित्य ठाकरे यांचा काका राज ठाकरेंना टोला
Raj Thackeray, Aaditya Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सध्या राज्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणावरून गदारोळ माजला आहे. मनसेने (MNS) राज्य सरकारला 3 मे पर्यंत मशिदीबाहेरून लाऊडस्पीकर काढण्याचा धमकी दिली आहे. असे न घडल्यास राज्यव्यापी निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख व आपले काका राज ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, ‘लाऊडस्पीकरवर बोलण्याऐवजी वाढत्या महागाईबद्दल बोला,’

‘आपल्या भाषणामध्ये मशिदी आणि त्यावरील लाऊडस्पीकरवर भाष्य करण्याऐवजी पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजीबद्दल बोलले पाहिजे. गेल्या 60 वर्षांमध्ये काय घडले याऐवजी अलीकडच्या 2-3 वर्षात काय झाले आहे याबाबत बोलले पाहिजे,’ असे आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2 एप्रिल रोजी मशिदींतील हाय डेसिबल लाऊडस्पीकर हटवण्याची जोरदार मागणी केली होती.

शिवाजी पार्क येथील सभेला संबोधित करताना मनसे प्रमुख म्हणाले होते की, मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत तर, मशिदीबाहेर मोठ्या आवाजात 'हनुमान चालीसा' वाजवण्यासाठी लाऊडस्पीकर लावले जातील. 12 एप्रिल रोजी ठाण्यातील जाहीर सभेत बोलताना ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारला 3 मे पूर्वी कारवाई करण्याचा अल्टिमेटम देत मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.

दरम्यान, मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी गुरुवारी पक्ष सोडला. यावेळी त्यांनी सांगितले की, पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे मशिदींमधून लाऊडस्पीकर हटविण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आपण पक्षामधून बाहेर पडत आहोत. ठाकरे यांना लिहिलेले पत्र शेख यांनी फेसबुकवर शेअर केले आहे, ज्यामध्ये आपण ‘जड अंतःकरणाने’ राजीनामा देत असल्याचे सांगितले.