Amul Hikes Milk Prices (Photo Credit: PTI)

देशातील जनता सध्या महागाईने (Inflation) त्रस्त आहे. महागाईच्या बाबतीत सर्वसामान्यांसाठी एकामागून एक वाईट बातम्या येत आहेत. कांदा, पेट्रोल, भाजीपाला आणि डाळींच्या वाढलेल्या किंमतीनंतर दूरसंचार कंपन्यांनी प्रीपेड योजना महाग केल्या. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. आता महागाईबाबत आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमूल (Amul Milk) आणि मदर डेअरी या दोन्ही सर्वात मोठ्या आणि आघाडीच्या दूध कंपन्यांनी मिळून दुधाचे दर (Milk Rate) वाढवले ​​आहेत. अमूलने गुजरात, दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल आणि मुंबईसह महाराष्ट्रात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे.

मदर डेअरीने फक्त दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. मदर डेअरीने टोन्ड, डबल टोन्ड आणि गायीच्या दुधावर प्रतिलिटर 3 रुपये वाढ केली आहे. अमूलच्या नव्या किंमती लागू झाल्यावर, अमूल गोल्डचे अर्ध्या लीटरचे पाकिट 28 रुपये, तर अमूल ताझाचे दीड लीटरचे पाकिट 22 रुपयांना उपलब्ध असेल. 15 डिसेंबरपासून हे नवीन दर लागू होतील. अमूलने अमूल शक्तीच्या पॅकेटवरील किंमती वाढवल्या नाहीत. अमूल शक्तीचे अर्ध्या लिटरचे पाकीट 25 रुपयांना मिळेल. मदर डेअरीच्या नवीन किंमतीनुसार 1 लिटर पूर्ण क्रीम दूध 55 रुपये आणि 1 लिटर टोन्ड दूध 45 रुपयांना उपलब्ध होईल. (हेही वाचा: Inflation Rate: कांद्याच्या दरासोबत भाजीपाला, धान्य, मांसाहारही महागला; तीन वर्षांतील सर्वोच्च पातळी

दररोज 1.4 दशलक्ष लिटर दुधाची विक्री करणाऱ्या अमूलने,  पशुधन व इतर खर्चांच्या किंमती वाढल्यामुळे ही दरवाढ झाल्याचे सांगितले आहे. या वर्षाच्या पशुधनाच्या किंमतींमध्ये 35 टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये अमूलच्या दुधाच्या किंमतींमध्ये 2 वेळा वाढ होत आहे. देशातील अनेक राज्यांत दुधाचे उत्पादन कमी झाल्याचे अमूल आणि मदर डेअरी या दोन्ही मोठ्या कंपन्यांचे म्हणणे आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पावसाळा सुरू होण्यास होणारा विलंब हे आहे, यामुळेच पशुचारा महागला.