Rahul Gandhi | (File Photo)

पेगासस सॉफ्टवेयर (Pegasus software) वापरुन देशातील राजकीय नेते, पत्रकार आणि अनेक व्यक्तींवर पाळत ठेवली गेल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून आले आहे. या सर्व प्रकरणाचे जोरदार पडसाद आस संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी तर सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेत पॅगसस हे एक शस्त्र आहे असे म्हटले. या प्रकरणात गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली चौकशी व्हवी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले की, पेगॅसस सॉफ्टवेअरला इस्राईल देशाने एका शस्त्राच्या रुपात वर्गीकृत केले आहे. त्या हत्याराचा वापर दहशतवाद आणि दहशतवादी कारवाया करण्यात गुंतलेल्या लोकांविरोधात करायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री या शस्त्राचा वापर भआरत आणि आमच्या संस्थाविरुद्धच करत आहेत.

राहुल गांधी यांनी आरोप केला की पेगॅसस या शस्त्राचा वापर सरकारने राजकीय कारणासाठी केला. त्यांनी कर्नाटकमध्ये या शस्त्राचा उपयोग केला. अनेक गोष्टींच्या तपासात अडथळा आणण्यासाठीही त्यांनी या शस्त्राचा वापर केला. त्यांनी या शस्त्राचा वापर सर्वोच्च न्यायालय आणि या देशाती संस्थांच्या विरोधातही केला आहे. राहुल गांधी यांनी केंद्रावर तोफ डागत पुढे म्हटले की, सरकारेन पेगॅससच्या माध्यमातून जे काही केले त्याला एकच शब्द आहे. तो शब्द म्हणजे 'देशद्रोह'. या शब्दाव्यतीरिक्त दुसरा कुठलाच शब्द नाही, असे राहुल गांधी म्हणाले. त्यामुळे या प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यायला हवा.  (हेही वाचा, Agricultural Law: 'त्यांच्या अश्रूंमध्ये सर्व काही दिसते', राहुल गांधी यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र)

राहुल गांधी यांनी पुढे म्हटले की, त्यांनी माझाही फोन टॅप केला. ही बाब केवळ माझ्या व्यक्तिगततेशी संबंधित नाही. मी विरोधी पक्षाचा नेता आहे. अनेक मुद्दे, प्रश्न उपस्थित करतो. त्यामुळे हा हल्ला माझ्या व्यक्तिगततेवर नाही तर जनतेच्या आवाजावर केलेला हल्ला आहे.