Amarnath Yatra 2022: यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवेचा शुभारंभ; भाविक 30 जून ते 11 ऑगस्टपर्यंत घेऊ शकतात दर्शन
Amarnath Yatra (Photo Credit: Twitter)

कोरोना विषाणू महामारीमुळे दोन वर्षांपासून बंदी घालण्यात आलेली अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra 2022) 30 जूनपासून सुरू होणार आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या पवित्र स्थळाच्या दर्शनासाठी वर्षभर मोठ्या संख्येने भाविक प्रतीक्षा करत असतात. अमरनाथ मंदिर यावर्षी 11 ऑगस्टला बंद होणार आहे. यंदा प्रथमच प्रवाशांच्या सोयीसाठी श्रीनगर ते पंचतरणी (Panchtarni) अशी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली आहे. पुढे अमरनाथ गुहेत जाण्यासाठी पंचतरणीपासून 6 किमी चालावे लागते. केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी बुधवारी श्रीनगर ते अमरनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवेचे उद्घाटन केले.

आता श्रीनगर ते नुनवान आणि नीलग्रथ मार्गावर सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे एका दिवसात अमरनाथ यात्रा पूर्ण होऊ शकणार आहे. अशाप्रकारे प्रथमच, भाविक श्रीनगरहून थेट पंचतरणीला सहज पोहोचू शकतात. सिन्हा म्हणाले की, श्रीनगरमधील यात्रेकरूंसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यासाठी सरकार दीर्घकाळापासून प्रयत्न करत होते, जी आता सुरु होणार आहे. आता बुकिंगसाठी भाविक श्राइन बोर्डाच्या वेबसाइटवर सहज लॉग इन करू शकतात.

अमरनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंना आधार कार्ड जवळ बाळगणे गरजेचे आहे, त्याशिवाय यात्रा पूर्ण होणार नाही. अमरनाथ यात्रा 2022 ला भेट देणाऱ्या यात्रेकरूंच्या मुक्कामासाठी जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात 20 विश्रांतीची ठिकाणे तयार करण्यात आली आहेत. एका वेळी 8000 लोक या विश्रामगृहात राहू शकतात. 13 वर्षांखालील किंवा 75 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती अमरनाथ यात्रेत सहभागी होऊ शकत नाही. 6 आठवड्यांपेक्षा जास्त गर्भवती महिलाही ही यात्रा करू शकणार नाहीत. (हेही वाचा: केंद्र सरकार माशांच्या माध्यमातून शोधणार गंगेच्या स्वच्छतेची पातळी; 'या' पद्धतीने होणार नदीच्या आरोग्याची तपासणी)

अहवालानुसार, अमरनाथ मार्गावरील हेलिकॉप्टर तिकिटाची किंमत 1,445 रुपयांपासून सुरू होते आणि 4,710 रुपयांपर्यंत जाते. दरम्यान, श्री अमरनाथ श्राइन बोर्डानुसार अमरनाथ यात्रा पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांनी होणार आहे. दररोज 10 हजार यात्रेकरू दर्शन घेऊ शकतील. हेलिकॉप्टरने येणाऱ्या यात्रेकरूंची संख्या वेगळी असेल. यावेळी श्राइन बोर्डाने बालटाल ते डोमेल या 2.75 किमी प्रवासासाठी मोफत बॅटरी कार सेवा देण्याबाबत भाष्य केले आहे.