गर्भपाताची गोळी (Abortion Pill ) घेतल्यानंतर शरीरात निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे 33 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची अपवादात्मक आणि तितकीच धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कर्नाटक (Karnataka) राज्यातील बंगळुरु (Bengaluru) येथे घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गर्भपाताची गोळी (Abortion Pill Case Bengaluru) घेऊन मृत्यू झालेली पीडित महिला ही 11 महिन्यांच्या बाळाची आई आहे. प्रीती कुशवाह असे मृत महिलेचे नाव असून ती एका नामांकित ई-कॉमर्स कंपनीत नोकरीला होती. तिचा नवरा एका खासगी कंपनीत कामाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वैद्यकीय तपासणीमध्ये गर्भवती असल्याची माहिती प्रीती कुशवाह आणि तिच्या पतीला मिळाली. 10 डिसेंबर रोजी त्यांनी प्रीतीची (मयत) वैद्यकीय तपासणी केली होती. आगोदरचे मूल केवळ 11 महिन्यांचे आहे. त्यामुळे त्याच्या संगोपणावर परिणाम होऊ नये. हा विचार करुन दुसऱ्यांदा इतक्या कमी कालावधीत गरोदर राहायचे नाही असा विचार प्रीती कुशवाह हिने पक्का केला. त्यामुळे गर्भपात करण्याचे तिने मनाशी पक्के केले. (हेही वाचा, Amravati Crime: पोटावर बॅग मारल्याने महिलेचा गर्भपात; अमरावती शहरातील पांढुरणा भागातील घटना)
गर्भपात करण्याची योजना मनात पक्की केल्याने तिने आपल्या पतीकडे गर्भपाताच्या गोळीसंदर्भात विचारणा केली. पतीने पत्नीला गर्भपात करण्यास विरोध दर्शवला. दरम्यान, सोमवारी रात्रीच्या सुमारास फिरायला गेल्यावर प्रितीला गर्भपाताची गोळी मिळाली. जी तीने घेतली. गोळी घेतल्यानंतर तिच्या शरीरात गुंतागुंत निर्माण झाली. तीला रस्तस्त्राव सुरु झाला. शिवाय असहय्य वेदनाही तिला सुरु झाल्या. तिच्या पतीने तिला रुग्णालयात जाण्याबाबत आग्रह केला परंतू तिने नकार दिला.
दरम्यान, मंगळवारी सकाळी ती अचानक बेशुद्ध पडली. पती आणि तिच्या भावाने तिला रुग्णालयात दाखल केले. परंतू, डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात कोणताही गैरप्रकार दिसून आला नाही.
गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्यानंतर प्रीतीचा मृत्यू झाल्याची तक्रार मृताच्या भावाने पोलिसांत दिली. याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.