केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशातील 3 विमानतळांचे होणार खाजगीकरण, 50 वर्षांसाठी भाडेतत्वावर देणार
File image of Union HRD Minister Prakash Javadekar (Photo Credits: PTI)

आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Union Ministers Prakash Javadekar) यांनी मंत्रिमंडळाने घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांविषयी माहिती दिली. यातील एक निर्णय विमानतळाशी (Airports) संबंधित आहे. जावडेकर म्हणाले की, जयपूर (Jaipur), गुवाहाटी (Guwahati) आणि तिरुअनंतपुरम (Thiruvananthapuram) विमानतळ भाड्याने (Privatize) देण्याच्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिली आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी (Public Private Partnership) अंतर्गत सरकारने ही मंजुरी दिली आहे. म्हणजेच ही तीन विमानतळे आता खासगी कंपन्यांच्या ताब्यात जातील. मोदी सरकार विमानतळाच्या खाजगीकरणाचा निर्णय घेईल अशा बातम्या आधीपासून आल्या होत्या, त्यावर आता अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झाले.

मेसर्स अदानी एन्टरप्रायजेस लिमिटेडला ही तीन विमानतळे 50 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यांचे कामकाज, व्यवस्थापन आणि विकास आता या कंपनीकडे देण्यात येणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने यासाठी जागतिक स्पर्धात्मक निविदा काढल्या ज्यामध्ये मेसर्स अदानी एंटरप्राईजेस लिमिटेडला यशस्वी निविदाकार म्हणून घोषित करण्यात आले. याद्वारे या तीन विमानतळांचे कामकाज सुधारेल आणि सार्वजनिक क्षेत्रात आवश्यक गुंतवणूक होईल अशी अपेक्षा आहे. दशकांपूर्वी सरकारने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत दिल्ली व मुंबई यांना भाड्याने दिले होते. (हेही वाचा: देशातील प्रत्येक 4 पैकी एका व्यक्तीमध्ये निर्माण झाल्या कोरोना विषाणूशी लढणाऱ्या Antibodies)

प्रकाश जावडेकर यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाचे फायदे समजावून सांगितले की, या निर्णयामुळे 1070 कोटी रुपये मिळतील, जे विमानतळ प्राधिकरणामार्फत अन्य छोट्या शहरांमध्ये विमानतळ विकसित करण्यासाठी वापरण्यात येतील. त्याचा दुसरा फायदा म्हणजे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यात येतील. दरम्यान, कोविड-19 मुळे, यावर्षी जूनमध्ये एएआयने अहमदाबाद, मंगलूरू आणि लखनऊ ही तीन विमानतळे व्यवस्थापनासाठी अदानीला आणखी तीन महिन्यासाठी दिली. याचा अर्थ असा की त्यांना व्यवस्थापित करण्यासाठी त्यांच्याकडे 12 नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे.