होळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Govt Employees) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने देशातील 47 लाख कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ (Dearness Allowance) आणि 68 लाख पेन्शनधारकांना महागाई दिलासा (Dearness Relief) देण्याची मोठी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याची औपचारिक घोषणा अद्याप झालेली नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 1 मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत वाढ करण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे.
मात्र बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीबाबत कोणतीही पत्रकार परिषद घेण्यात आली नाही किंवा सरकारकडून कोणतेही प्रसिद्धी पत्रक जारी केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 मार्चनंतर कधीही याची घोषणा करू शकतात, असे सांगण्यात येत आहे. म्हणजेच होळीनंतर अर्थ मंत्रालय त्याची अधिसूचना जारी करेल. अनेक माध्यमांनी याबाबतचे अहवाल दिले आहेत.
माहितीनुसार, महागाई भत्त्याच्या आकडेवारीचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात 4 टक्के वाढीचा प्रस्ताव मंजूर केला. अशाप्रकारे डीए आता 38 वरून 42 टक्के होईल. महागाई भत्त्यात वाढीची अधिसूचना जारी झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ लागू केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, जर सर्व काही सुरळीत झाले तर नवीन महागाई भत्त्यासह मार्चचा पगार दिला जाईल, यासोबतच जानेवारी व फेब्रुवारीची थकबाकी देखील मिळणार आहे. (हेही वाचा: RBI Penalty on Amazon Pay: नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरबीआयची कडक कारवाई; अॅमेझॉन पे ला 3.06 कोटींचा दंड)
वाढीव महागाई भत्ता आणि सवलत 1 जानेवारी 2023 पासून लागू होईल. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत वर्षातून दोनदा सुधारित केली जाते. 1 जानेवारी आणि 1 जुलैपासून हे लागू मानले जाते. गेल्या वेळी सप्टेंबर महिन्यात महागाई भत्ता फेब्रुवारी 2023 पर्यंत वाढवण्यात आला होता.