नववर्षाच्या (New Year) पहिल्या दिवशी (1 जानेवारी 2019) जगभरात एकूण 3 लाख 95 हजार 72 बालकांचा जन्म झाल्याची माहिती युनायडेट नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रेंस इमरजेन्सी फंड (UNICEF)ने दिली. यात भारतात (India) एकूण 69,944 बालकांचा जन्म झाला. ही संख्या जगात सर्वाधिक आहे.
युनिसेफच्या रिपोर्टनुसार, भारताखालोखाल चीनमध्ये (China) एकूण 44,940 बालकांचा जन्म झाला. तर नायझेरियामध्ये (Nigeria) एकूण 25,685 बालके जन्माला आली. 2019 हे वर्ष युनिसेफच्या बालहक्क करार स्वीकाराचा तिसावा वर्धापनदिन आहे. यानिमित्ताने युनिसेफतर्फे जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
युनिसेफचे उप कार्यकारी निर्देशक चार्लोट पेट्री गोर्निट्जका यांनी सांगितले की, नववर्षात सर्व बालकांना त्यांचे सर्व अधिकार मिळतील असा आपण संकल्प करुया. यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांना योग्य प्रशिक्षण मिळाल्यास आणि प्रत्येक बालकास उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळाल्यास लाखो बालकांचा जीव वाचण्यास मदत होईल.
2017 मध्ये सुमारे 10 लाख मुलांचा जन्मताच मृत्यू झाला. तर सुमारे 25 लाख मुलांचा मृत्यू जन्माच्या पहिल्या महिन्यातच झाला, अशी माहिती युनिसेफने दिली.