तामिळनाडूच्या (Tamil Nadu) चैनई (Chennai) मधील पोरूर (Porur) गावामध्ये एका लहान मुलाचं खेळताना डोकं चक्क पातेल्यामध्ये अडकल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पातेल्यात मुलाचं डोकं अडकल्याचं पाहून त्याच्या कुटुंबियांची त्याच्या सुटकेसाठी धावपळ सुरू झाली. अथक प्रयत्नांनंतर पातेलं कापून मुलाची सुटका करण्यात आली. लहान मुलं खेळता खेळता कधी काय करतील याचा नेम नसल्याने घरात मुलांचा वावर असेल तर त्यांच्या खेळण्यांबाबत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.
नवभारत टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, पोरूर गावामध्ये मंगला नगर मध्ये आनंद आणि कृतिकाच्या अवघ्या 18 महिन्याच्या मुलासोबत हा प्रकार झाला. क्रिथिगन हा दीड वर्षाचा मुलगा घरीच खेळत होता. एका पातेल्यामध्ये तो वाकून बघण्याचा प्रयत्न करत होता. यामध्ये त्याचं डोकं पातेल्यात अडकलं. बाळाचं डोकं पातेल्यात अडकल्याचं पाहून त्याचे आई बाबा भयभीत झाले. त्यांनी बाळाचं डोकं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र ते यशस्वी झाले नाही. त्यानंतर त्यांनी हा प्रकार अग्निशमन दलाला सांगून तेथून बाळाच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. Hyderabad Shocker: पार्किंग लॉट मध्ये झोपलेल्या 3 वर्षीय मुलावर चढली कार; सुन्न करणार्या घटनेचा व्हिडीओ वायरल.
तामिळनाडू मध्ये दीड वर्षाच्या मुलाचं डोकं खेळता खेळता पातेल्यामध्ये अडकलं. सुरुवातीला अग्निशमन आणि बचावकार्य मधील जवानांनी पातेलं कापण्याचे प्रयत्न केले मात्र ते अयशस्वी ठरले. त्यानंतर मुलाच्या सुटकेसाठी नारळाचं तेलं डोक्याच्या भागाला लावून डोकं बाहेर काढण्याचे प्रयत्न केले ते देखील अशस्वी ठरले. बाळ या दरम्यान आक्रमक झाले आणि रडायला लागले होते. मात्र जवानांनी आधी त्याची सुरक्षा लक्षात घेता त्याच्या सुटकेपूर्वी त्याला शांत केले.
बाळाला शांत करत फायरमॅनने स्थिर अवस्थेत ठेवत पातेलं अत्यंत सावधानपूर्वक कापलं. 30 मिनिटांच्या या रेस्क्यू ऑपरेशन नंतर बाळाची सुरक्षित सुटका करण्यात आली. यामध्ये मुलाला सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही.