धक्कादायक! मंत्र्याने लाच म्हणून मागितल्या बॉलिवूडच्या 2 अभिनेत्री; सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्विटने माजली खळबळ
Subramanian Swamy. (Photo Credits: ANI/File)

देशात सध्या सुरु असलेला प्रकल्प पूर्ण करून देण्यासाठी एका मंत्र्याने चक्क बॉलिवूडच्या दोन अभिनेत्री लाच म्हणून मागितल्या असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भाजप (BJP) पक्षाचे जेष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी ट्विट करून ही माहिती दिली असल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. देशात लागू असणाऱ्या भ्रष्टाचार कायद्यामध्ये (Corruption Act) अशा प्रकारासाठी काही कलम आहे का? किंवा कोणता बदल करता येईल याबाबत सुब्रमण्यम स्वामी संशोधन करीत आहेत. यासाठी त्यांनी जनतेकडून त्यांची मते आणि सूचना मागितल्या आहेत.

सुब्रमण्यम स्वामी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘मी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामधील अशा कलमाचा शोध घेत आहे, ज्याद्वारे प्रकल्पाचे काम पूर्ण करून देण्यासाठी एका मंत्र्याने लाच म्हणून दोन बॉलिवूड अभिनेत्रींच्या पुरवठ्याची मागणी केली असेल, तर तो मंत्री दोषी ठरेल. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.’

(हेही वाचा: मुंबई मध्ये अडीच लाखांची लाच घेताना पालिकेच्या अधिकाऱ्यांना सापळा रचून रंगेहात पकडले)

सुब्रमण्यम स्वामींनी त्या मंत्र्याचे नाव जरी जाहीर केले नसले, तरी यामुळे राजकीय गोटात चर्चा आणि खळबळ सुरु आहे. याबाबत महिला वकील आभा सिंह म्हणाल्या, ‘सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेले आरोप फार मोठे आणि धक्कादायक आहेत. हा महिलांचा अपमान असल्याने, त्या मंत्र्याविरुद्ध ताबडतोब गुन्हा दाखल करून चौकशी सुरु करण्यात यावी.'