प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

मुंबई: अनधिकृत बांधकामावर कोणतीही कारवाई केली जाऊ नये यासाठी अडीच लाखांची लाच घेताना महापालिकेचे 2 सुपरवायझर, व मुकादमला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले.  महेश कांबळे, धीरज कांबळे (सुपरवायझर, इमारत व कारखाने विभाग, सी वॉर्ड, मुंबई) व चंद्रकांत महादेव कांबळे (मुकादम, इमारत व कारखाने विभाग, सी वॉर्ड, मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. या अधिकाऱ्यांनी आधी 50 हजार व नंतर साडेतीन लाखांची मागणी केली होती.

ज्या व्यक्तीने याबाबत तक्रार केली होती त्याने टेरेस फ्लॅटच्या ओपन टेरेसवर खासगी काँट्रँक्टरकडून शेड, ग्रिल व भिंतीचे बांधकाम केले होते. यापैकी काही बांधकाम महापालिकेकडून पाडण्यात आले होते. त्यानंतर जून 2018 मध्ये महापालिकेचे दोन कर्मचारी या व्यक्तीच्या घरी आले व त्यांनी उर्वरित बांधकाम पाडायचे नसल्यास 2 इंजिनिअर व संबंधित कर्मचारी यांना  मॅनेज करावे लागेल असे सांगितले. त्यासाठी  साडेतीन लाखांची मागणी केली. (हेही वाचा: भाजपच्या पारदर्शी कारभाराला तडे; लाच प्रकरणात ३ मंत्र्यांच्या स्वीय सहायकांना अटक)

याबाबत या व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. पडताळणी केली असता अशाप्रकारे पैशांची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.  त्यानुसार सुपरवायझर महेश आणि धीरज कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सापळा रचून या दोघांच्या वतीने अडीच लाख घेताना चंद्रकांत कांबळे याला रंगेहाथ पकडण्यात आले.