राष्ट्रीय अवयवदान दिन Photo Credits : Max Pixel

अवयवदान हेच 'श्रेष्ठदान' असं म्हटलं जातं. अवयवदानाचे महत्त्व जाणणाऱ्या महाराष्ट्राला यंदा केंद्र सरकारकडून पुरस्कार मिळाला आहे. 30 नोव्हेंबरला राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त दिल्लीमध्ये 'नॅशनल ऑर्गेन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन'तर्फे (National Organ and Tissue Transplant Organization) (NOTTO) आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. (हेही वाचा - Indian Organ Donation Day: राष्ट्रीय अवयवदान दिनी दूर करा अवयव दानाबाबतचे हे '5' समज -गैरसमज)

शनिवारी राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त 'नोटो' मार्फत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अवयवदानाच्या चळवळीत योगदान देणाऱ्या राज्यांना पुरस्कार देण्यात आला. नोव्हेंबर 2018 ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत झालेल्या अवयवदानाच्या आकडेवारीनुसार, पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. त्यात अवयवदानात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते सर्वोत्तम राज्य पुरस्कार देण्यात आला. 'रोटो-सोटो'च्या संचालक डॉ. लोबो गाजिवाला यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

हेही वाचा - 'मुंबई'तील 2 वर्षांच्या मुलाने केले हृदयदान; यशस्वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेने चेन्नईतील मुलाचे प्राण वाचले

दरम्यान, यावेळी गाजिवाला यांनी सांगितले की, अवयवदानासाठी महाराष्ट्राला सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार मिळणे आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. अवयवदानाविषयी लोकांमध्ये केलेल्या जनजागृतीसाठी आम्ही जे प्रयत्न केले त्याची ही पावती आहे.

नोव्हेंबर 2018 ते ऑक्टोबर 2019 दरम्यान महाराष्ट्रात झालेले अवयवदान -

  • शरीरातून काढून प्रत्यारोपणासाठी पाठवलेले अवयव - 446
  • प्रत्यारोपित झालेले अवयव - 449 (इतर राज्यांतून महाराष्ट्रात प्रत्यारोपणासाठी आलेल्या अवयवांचाही समावेश)
  • ब्रेनडेड झालेले रुग्ण - 193
  • प्रत्यारोपणासाठी अवयवदान केलेले ब्रेनडेड रुग्ण - 153

रोटो-सोटो, झेडटीसीसी आणि इतर सामाजिक संस्थांमार्फत अनेक अवयवदान जनजागृती कार्यक्रम करण्यात आले. महाराष्ट्रातील अवयवदानात मुंबई पहिल्या तर पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे.