मध्य प्रदेशाच्या (Madhya Pradesh) भोपाळ (Bhopal) येथे एका व्यक्तीने पाच दिवसांत दोन तरुणीशी लग्न करून पळून गेल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, एका तरुणीच्या परिवारातील सदस्यांनी शनिवारी खंडवा येथील कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी आरोपी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपी हा इंदूरच्या मूसाखेडी परिसरात राहणारा आहे, असेही तक्रारीत म्हटले आहे. त्याने दोन डिसेंबर रोजी खंडवा येथील एका तरुणीशी लग्न केले आहे. तर, सात डिसेंबला दुसऱ्या मुलीशी लग्न केले आहे, अशी माहिती मिळत आहे.
कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी बी एल मंडलोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीनुसार आरोपीच्या दुसऱ्या लग्नामध्ये खंडावा येथील एक व्यक्ती गेला होता. त्याने लग्नात नवरदेवाला ओळखताच त्याचा फोटो काढून पहिल्या मुलीच्या नातेवाईकांना पाठवला. यामुळे त्याच्या दुसऱ्या लग्नाबाबत सर्वांना माहिती झाली. या माहितीच्या आधारावर पहिल्या मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या लग्नात नवरी मुलीच्या घरच्यांना 10 लाख रुपयांचा खर्च आला आहे. हे देखील वाचा- Andhra Pradesh: तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून मुलीने केले किटकनाशक प्राशन; उपचारादरम्यान मृत्यू
आरोपीने लग्न झाल्यानंतर खंडवा येथील मुलीला आपल्या घरीदेखील घेऊन गेला होता. मात्र, कामानिमित्त भोपाळला जात आहे, असे सांगत तो घराबाहेर पडला. दरम्यान, सात डिसेंबरला दुसरे लग्न केल्यानंतर आरोपी आपल्या घरी परतलाच नाही, असे मंडलोई यांनी सांगितले आहे.