अखेर देशात चाललेल्या लोकसभा निवडणुक मतदानाचा सातवा आणि शेवटचा टप्पा (Lok Sabha Elections 2019) आज पार पडत आहे. देशात एकूण 59 जागांसाठी हे मतदान होणार आहे, यामध्ये एकूण 918 मतदारांचे भविष्य EVM मध्ये बंद होणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेशसह, झारखंड, हिमाचल प्रदेश, चंदिगढ इथे मतदानाला सुरुवात झाली आहे. देशात सर्वात जास्त जागा असलेल्या उत्तर प्रदेश मधील 13 जागांसाठी आज मतदान होणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाराणसी मतदारसंघाचाही समावेश आहे.
अशा आहेत राज्यनिहाय जागा –
पंजाब आणि उत्तर प्रदेश - प्रत्येकी 13
पश्चिम बंगाल - 9
बिहार आणि मध्य प्रदेश - प्रत्येकी 8
हिमाचल प्रदेश - 4
झारखंड - 3
चंडीगड - 1
(हेही वाचा: 'काल थोडक्यात वाचलो, माझी हत्याच झाली असती', भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा आरोप)
दरम्यान, हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा असल्याने उमेदवारांसाठी अतिशय महत्वाचा आहे. 2014 मध्ये या 59 जागांपैकी 30 जागा भाजपने जिंकल्या होत्या. यामध्ये सर्वात जास्त उत्तर प्रदेश मध्ये 12, बिहारमध्ये 7 पंजाबमध्ये 6 जागांचा समावेश होता. महत्वाचे म्हणजे पश्चिम बंगालमध्ये भाजप एकही जागा जिंकू शकले नव्हते. मात्र यावेळी या सर्व ठिकाणी भाजपला कडवे आव्हान निर्माण होणार आहे.
आज ठरणार या दिग्गजांचे नशीब – आजच्या शेवटच्या टप्प्यात अनेक दिग्गज मैदानात उतरले आहेत, यामध्ये नरेंद्र मोदी, रविशंकर प्रसाद, रामकृपाल यादव, आर. के सिंह, अश्विनी कुमार चौबे, हरसिमरत कौर बादल, अभिनेता सनी देओल, प्रणीत कौर, किरण खेर, सनोज सिन्हा, अभिनेते रविकिशन, शत्रुघ्न सिन्हा, मीसा भारती यांचा समावेश आहे.
दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे आज गोवा इथे विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे, त्याचसोबत तामिळनाडू इथेही विधानसभा निवडणुका पार पडत आहेत.