Amit Shah | (Photo Credit: ANI)

Lok Sabha Elections 2019: 'काल थोडक्यात वाचलो, माझी हत्याच झाली असती' असे खळबळजनक विधान करत भाजप अध्यक्ष अमित शाह (Amit Shah) यांनी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत अनेक गंभीर आरोप केले आहेत. पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यात लोकसभा निवडणूक 2019 प्रचार रॅली दरम्यान मंगळवारी (14 एप्रिल 2019) मोठा हिंसाचार भडकला. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेत पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), पश्चिम बंगाल पोलीस आणि निवडणूक आयोग (Election Commission) यांच्यावर आरोप आणि दाव्यांचे फैरीच झाडल्या आहेत.

पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना अमित शाह म्हणाले, पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणतात की भाजप कार्यकर्त्यांनी हिंसाचार केला. पण, भाजप केवळ पश्चिम बंगाल या एकाच राज्यात नव्हे तर देशभरात निवडणूक लढत आहे. देशातील इतर ठिकाणी हिंसा होत नाही. केवळ पश्चिम बंगालमध्येच कशी काय होते? देशात या आधी सहा टप्प्यांतील मतदानाला भाजप समोरे गेला. मात्र, यातील एकाही ठिकाणी असा हिंसाचार घडला नाही.

दरम्यान, या हिंसाचारात ईश्वर चंद्र विद्यासागर यांचा पुतळा तोडण्यात आला. हा पुतळा भाजप कार्यकर्त्यांनी तोडला नाही. ज्या कॉलेजमध्ये हा पुतळा तोडण्याता आला त्या कॉलेजचे फाटक (गेट) बंद होते. तर, मग पुतळा तुटलाच कसा? हा पुतळा तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनीच तोडला असल्याचा आरोप करत हिंसाचारावेळी रॉकेल भरलेल्या बॉटलही फेकण्यात आल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

दरम्यान, पश्चिम बंगाल राज्यावर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नसल्याचे अमित शाह म्हणाले. मात्र, काही झाले तरी, ममता बॅनर्जी यांच्या सरकारची उलटी गनती सुरु झाली आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने कोणतीच कारवाई का केली नाही, असा सवालही शाह यांनी उपस्थित केला. (हेही वाचा, पश्चिम बंगाल: अमित शाह यांच्या रोड शो मध्ये हिंसाचार; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज)

दरम्यान, कोलकाता येथे अमित शाह यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर राजकारण चांगलेच तापले असून, राजधानी दिल्ली ते देशातील विविध राज्यांतूनही तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना आदींनी या हल्ल्याचा निशेध केला आहे.