Lockdown: मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूमधील राज्य सरकारच्या सर्व दारू दुकाने बंद ठेवण्याचे दिले आदेश; ऑनलाईन विक्रीत सूट
Long Queue Outside Liquor Shop (Photo Credits: Twitter/@Yatharth9815)

लॉकडाउनचा (Lockdown) कालावधी संपत नाही तोपर्यंत मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) शुक्रवारी राज्यातील सरकारी किरकोळ दारू विक्री केंद्रे बंद करण्याचे आदेश दिले. लॉकडाऊन कालावधीत दारू विक्रीसाठी (Liquor Sale) सरकार ऑनलाइन आणि होम डिलिव्हरीचा वापर करू शकते, असे कोर्टाने म्हटले आहे. कोरोना व्हायरसचा धोका थांबविण्यासाठी अंमलात आलेल्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात दारूची दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली होती, पण मार्गदर्शक सूचनांचे संपूर्ण उल्लंघन असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. अधिवक्ता जी राजेश आणि कमल हासन यांच्या पक्षाच्या मक्कल निधी माया (MNM) यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती विनीत कोठारी आणि न्यायमूर्ती पुष्पा सत्यनारायण यांच्या खंडपीठाने दारूच्या दुकानांसमोर गर्दी आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याची दखल घेत निर्णय सुनावलं. (लॉकडाऊनच्या काळात दारू विक्रीसाठी ‘होम डिलिव्हरी’ पर्यायाचा विचार करण्याचा सर्वोच्च न्यायालयाकडून राज्य सरकारांना सल्ला!)

वाढत्या आर्थिक संकटाशी लढा देण्यासाठी 4 मे रोजी राज्य सरकारने 7 मे पासून दारूची दुकानं सुरू करण्याचा औपचारिक आदेश मंजूर केला होता. आदेशानुसार कडक सोशल डिस्टंसिंगच्या नियमांनुसार सकाळी 10 ते सायंकाळी 5 दरम्यान दुकाने कार्यरत असतील. गर्दी व्यवस्थापित करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्याचे आश्वासनही सरकारने दिले होते. 6 मे रोजी कोर्टाने याचिकेवर सुनावणी केली असता, न्यायाधीशांनी सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला आणि लॉकडाउन दरम्यान दारू विक्रीला परवानगी देण्यासाठी अनेक अटी घातल्या. गुरुवारी राज्यभरातीलअनेक भागातील दारूच्या दुकानात एक किलोमीटरपर्यंत पसरलेल्या रांगेत शेकडो लोक दारू खरेदी करण्यासाठी उभे दिसले.

गुरुवारी सरकारने 172 कोटी रुपयांच्या सुमारे 20 लाख लिटर मद्य विक्रीची नोंद केली. दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केलेला देशव्यापी लॉकडाउन 17 मे पर्यंत चालू राहील. राज्यात आज चेन्नईतील 399 सह सहाशे नवीन कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री सी विजयबास्कर यांनी दिली.