भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी (LIC) तर्फे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक खुशखबर समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार, एलआयसी मध्ये 8 हजाराहून अधिक जागांसाठी मेगाभरती होणार आहे. देशभरातील एलआयसीच्या केंद्रानुसार ही भरती प्रक्रिया पार पडणार असून लिपिक, सिंगल विंडो ऑपरेटर, रोखपाल, ग्राहक सेवा कार्यकारी अशा सहाय्यक पदांसाठीच्या रिक्त जागांसाठी अर्ज करता येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अर्ज भरण्याची सुरुवात झाली असून यासाठी तुम्ही www.licindia.in/careers या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.
प्राप्त माहितीनूसार उमेदवारांसाठी काही पात्रता निकष ठेवण्यात आले आहेत,यानुसार 18 ते 30 या वयोगटातील इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात, मागास वर्गीय जाती व जमातींसाठी वयाच्या निकषात सूट देण्यात आली आहे. कोणत्याही अभ्यासक्रमातील पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहेत. ही परीक्षा दोन स्तरावर पार पडेल, पूर्व आणि मुख्य परीक्षा असे स्वरूप असणार आहे. ऑनलाईन परीक्षेनंतर मुख्य परीक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात येईल.
लक्षात ठेवा:
अर्ज भरण्याची शेवटची तारीख: 1 ऑक्टोबर 2019
ऑनलाईन शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 17 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर
ऑनलाईन परीक्षा: 21 व 22 ऑक्टोबर
दरम्यान, एलआयसी तर्फे देशात मध्य, पूर्व, पूर्व केंद्रीय, उत्तर, उत्तर केंद्रीय, दक्षिण, दक्षिण केंद्रीय आणि पश्चिम या विभागांमध्ये मेगाभरती केली जाणार आहे. याकरिता महाराष्ट्रात मुंबई,ठाणे , रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, पुणे येथे परीक्षा केंद्रे असणार आहेत.