Kumbh Mela (Photo Credits-Twitter)

Kumbh Mela 2019: प्रयागराज (Prayagraj) येथे सुरु असलेल्या कुंभ मेळ्यात अनेक महिला गंगेत स्नान करण्यासाठी येतात. त्यामुळे प्रयागराज येथील उच्च न्यायालयाने वृत्तपत्र आणि संबंधित माध्यमांनी गंगेत स्नान करणाऱ्या महिलांचे फोटो काढण्यास बंदी घातली आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, स्नान घाटाच्या परिसरात 100 मीटर परिसरात फोटो काढण्यास बंदी घातली आहे. तर न्यायमूर्ती पीकेएस बघेल आणि पंकज भाटिया यांच्या खंडपीठाने याबद्दल आदेश दिले आहेत. त्यामुळे कोणत्याही नियतकालीकांना महिलांचे अंघोळीचे फोटो छापता येणार नाहीत. त्याचसोबत प्रसार माध्यमांवरही हे फोटो दाखवू नये असे ही सांगण्यात आले आहे. या प्रकरणी असीम कुमार नावाच्या व्यक्तीने एक याचिका न्यायालयात दाखल केली होती. तर याचिकेवरील सुनावणी येत्या 5 एप्रिल रोजी होणार आहे. (हेही वाचा-Vasant Panchami 2019: वसंत पंचमी दिवशी कुंभ मेळ्याचे तिसरे आणि शेवटचे शाही स्नान, जाणून घ्या यामागील महत्व)

कुंभ (Kumbh) येथे आज रविवारी (10 फेब्रुवारी) वसंत पंचमीचे औचित्य साधून तिसरे शाही स्नान पार पडणार आहे. या शाही स्नानावेळी कमीतकमी 2 करोड लोकांपेक्षा अधिक भक्तजन उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. या पूर्वी दोन शाही स्नान झाले होते. एक मकरसंक्रातच्या दिवशी तर दुसरे मौनी अमावस्येच्या दिवशी.