रोबो-कॉप ‘केपी-बॉट' (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात काय बदल होतील किंवा कोणत्या नवीन गोष्टी पाहायला मिळतील याचा काही नेम नाही. त्यात रोबोटिक्स क्षेत्रात घडलेली क्रांती तर अविश्वसनीय आहे. नुकतेच पुण्यात ट्राफिक कंट्रोल करण्यासाठी रोबोलो रस्त्यात उभे केले, तर आता केरळच्या पोलीसस्टेशनमध्ये देशातील पहिला रोबोट पोलीस अर्थात रोबो-कॉप ‘केपी-बॉट’ (KP-Bot) सेवेत दाखल झाला आहे. त्रिवेंद्रम पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री पिनरई विजयन (Pinarayi Vijayan) यांच्या हस्ते या रोबोचे उद्घाटन करण्यात आले. आश्चर्य म्हणजे केपी-बॉटला चक्क पोलीस उपनिरीक्षकाचा दर्जा देण्यात आला आहे, केपी-बॉट हा भारतातील पहिला ह्यूमनॉइड, तर जगातील चौथा रोबो आहे.

पोलीस मुख्यालयाच्या मुख्य कार्यालयासमोर या रोबोची ड्युटी असणार आहे. आलेल्या लोकांच्या स्वागतासह डेटा गोळा करणे, तसेच पोलिसांच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणणे ही कामे केपी-बॉट करणार आहे. तो लोकांना येण्याजाण्याचे निश्चित मार्गही सांगण्याचे काम करणार आहे. पोलिस महानिरीक्षक (डीजीपी) लोकनाथ बेहरा यांनी, ‘पोलिसांच्या कामकाजामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या मुख्य उद्देशाने हा रोबो समविष्ट केला गेला असल्याचे’ सांगितले. (हेही वाचा: पुण्यात वाहतूक नियमनासाठी चक्क रोबोट रस्त्यावर!)

या पहिल्या रोबोच्या लिंगाबाबत निर्णय घेताना महिला सशक्तीकरण आणि लैंगिक समानता लक्षात घेण्यात आली आहे. कार्यालयात येणारे लोक थेट या रोबोटशी संपर्क साधू शकतील. हा रोबो, अधिकाऱ्यांशी भेटीच्या वेळा निश्चित करणे, ओळखपत्र प्रदान करणे, लोकांच्या तक्रारींवर आधारित नवीन फाइल्स उघडणे अशी कामेदेखील करणार आहे. चेहरा ओळख आणि स्फोटक ओळख या गोष्टीदेखील या रोबोमध्ये समविष्ट करण्यात येणार आहेत.