पुण्यात वाहतूक नियमनासाठी चक्क रोबोट रस्त्यावर!
Traffic Control Robot in Pune (Photo Credits: Social Media)

पुणे (Pune)  तिथे काय उणे या उक्तीची अजून एक प्रचिती बुधवारी पुणेकरांना बुधवारी आली. पुण्याच्या चौकामध्ये बुधवारी चक्क रोबोट वाहतुक नियंत्रण (Traffic Control Robot) करत होते. प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या या उपक्रमाची चाचणी पुणे पोलिस वाहतुक मंडळाकडून घेण्यात आली आहे. पुण्यात प्रयोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या या उपक्रमाला कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो हे पाहून भविष्यात ही सोय पुण्याच्या चौकाचौकात होणार आहे.

रोबोट करणार पुण्यात वाहतुक नियंत्रकाच काम

पुण्यामध्ये रोबोट सिग्नल देण्याचं आणि वाहतुकीच्या नियमांबद्दल जनजागृती करण्याचं काम करणार आहेत. याकरिता 'एसपी रोबोटिक्स मेकर लॅब'च्या सहा विद्यार्थ्यांनी तयार केलेला रोबो पुण्याच्या रस्त्त्यांवर दिसणार आहे. . रोबोटला रिमोट किंवा मोबाइलच्या माध्यमातूनदेखील नियंत्रित करता येणार आहे. सिग्नल लाल झाल्यावर चौकातील पोलिस कर्मचारी रिमोटद्वारे वाहने झेब्रा क्रॉसिंगच्या मागे थांबविण्याचे आवाहन करतील. त्यासाठी रोबो हाताद्वारे 'STOP' असा इशारा करेल. तसेच, रोबोच्या पोटावर आलेल्या स्क्रीनवर वाहतूक नियम पाळण्याचा संदेश दिसेल. सीसीटीव्ही मदतीने वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्या व्यक्ती टिपता येणार आहेत.

एसपी रोबोटीक्स मेकरच्या ठाणे शाखेतील काहींचे मार्गदर्शन घेऊन पुण्यातील विद्यार्थ्यांनी हा रोबो तयार केला आहे. त्यासाठी सुमारे तीन लाख रुपये एवढा खर्च आला आहे. त्यात बॅटरी बसविण्यात आली आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर ती बॅटरी दिवसभर काम करू शकते.