पी चिदंबरम यांना अटक झाली ते INX मीडिया प्रकरण नक्की आहे तरी काय? जाणून घ्या घटनाक्रम
Congress leader P Chidambaram. (Photo Credits: PTI)

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या आयएनएक्स मीडिया (INX Media) प्रकरणात अखेर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम (P Chidambaram) यांना अटक झाली आहे. तब्बल 27 तासांच्या नाट्यमय घटनांनंतर सीबीआय ने (CBI) चिदंबरम यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर चिदंबरम हे बेपत्ता झाले होते. आज त्यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. यामध्ये सीबीआय चिदंबरम यांची 14 दिवसांची कोठडी मागू शकते, तर ते चिदंबरम जमिनासाठी अर्जही करू शकतात.

तर कॉंग्रेसच्या इतक्या मोठ्या नेत्यामागे, माजी अर्थमंत्र्यामागे ईडी हात धुवून का मागे लागली आहे? चला पाहूया हे आयएनएक्स मीडिया प्रकरण नक्की आहे काय.

आयएनक्स मीडिया प्रकरणात पी.चिदंबरम आणि कार्ती चिदंबरम (Karti Chidambaram) यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप आहेत. ही कंपनी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukerjea) यांची आहे. हे दोघेही सध्या शीना बोरा हत्याप्रकरणात तुरुंगात आहेत.

2007 साली (युपीए-1) पी. ची. चिदंबरम अर्थमंत्री होते. त्याकाळात या कंपनीमध्ये 4 कोटी 64 लाख इतक्या परदेशी गुंतवणुकीला मान्यता मिळाली. मात्र मूळ गुंतवणूक 305 कोटी रुपयांची झाली. या रकमेमध्ये घोटाळा झाला असल्याचे उघडकीस आले. यामध्ये त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांचा मोठा हात होता.

प्राप्तिकर खाते आणि महसूल विभागाने जेव्हा या बाबत कंपनीला नोरीस बजावली तेव्हा पी. चिदंबरम यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत कंपनीला नव्याने गुंतवणुकीसाठी परवानगी मिळवून दिली असल्याचे समोर आले. (हेही वाचा: INX Media Case: माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना सीबीआयकडून अटक)

या प्रकरणी तब्बल 10 वर्षानंतर म्हणजे, 2017 साली सीबीआयकडून प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आला. या दरम्यान कार्ती चिदंबरम यांच्या परदेशी दौऱ्यावर रोख आणली, ते आपली परदेशी खाती बंद करण्यासाठी बाहेर जात असल्याचा संशय होता. पुढे 2018 मध्ये त्यांना अटक करण्यात आली व 23 दिवसांनतर त्यांची सुटका झाली.

आयएनएक्स मीडिया मनी लॉन्ड्रिंग आरोपाखाली ईडीने कार्ती यांची 54 कोटींची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर इंद्राणी माफीच्या साक्षीदार बनत त्यावेळी नक्की काय घडले ते सांगितले. शेवटी 20 ऑगस्ट 2019 ला दिल्ली हायकोर्टाने पी. चिदंबरम यांचा अंतरिम जामीन फेटाळून लावला. त्यानंतर 27 तास गायब असलेल्या पी. चिदंबरम यांना काळ रात्री त्यांच्या जोरबाग येथील घरातून अटक केली.