SBI ग्राहकांनी 28 फेब्रुवारीपर्यंत KYC Update न केल्यास खातं होणार फ्रीज
SBI (Photo Credits: Facebook)

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँकेचे व्यवहार करण्यासाठी KYC करणे महत्त्वाचे असते. अन्यथा पैसे गुंतवणं यासह इतर बँकेचे व्यवहार रोखले जाऊ शकतात. यासाठी SBI ने आपल्या ग्राहकांना KYC तपशील अपडेट करण्यास सांगितले आहे. यासंदर्भात SBI ने ग्राहकांना SMS पाठवून सतर्क केले आहे. KYC तपशील अपडेट करण्यासाठी SBI ने ग्राहकांना 28 फेब्रुवारी पर्यंतची मूदत दिली असून त्या कालावधीत तपशील अपडेट न झाल्यास बँक खातं फ्रीज करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. (SBI ने घटवले MCLR दर, ग्राहकांसाठी होम, ऑटो लोन घेणे झाले स्वस्त)

भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व बँक खात्यांसाठी KYC तपशील अपडेट सक्तीचे केले आहे. त्यामुळे SBI ने हे पाऊल उचलले आहे. SBI च्या वेबसाईटवरील माहितीनुसार, KYC साठी करण्याकरता देण्यात येणाऱ्या कागदपत्रांवरील पत्ता आणि बँकेतील खात्यासाठी भरलेल्या फॉर्मवरील पत्ता सारखाच असणे गरजचे आहे. (नवीन वर्षापासून SBI च्या ATM मधून पैसे काढण्याच्या पद्धतीत बदल; OTP शिवाय काढता येणार नाहीत पैसे)

KYC Update करण्यासाठी काय करावे?

SBI च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, KYC साठी ग्राहकांना आपलं ओळखपत्रं द्यावं लागेल. SBI शाखेत जावून अद्यावत कागदपत्रं देवून तुम्ही KYC Update करु शकता.

KYC साठी लागणारी कागदपत्रं:

KYC Update करण्यासाठी तुम्ही पासपोर्ट, व्होटर आयडी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड यापैकी कोणत्याही ओळखपत्राचा वापर करु शकता. त्याचबरोबर पेन्शन, पोस्ट ऑफिसची कागदपत्रं देखील चालतील. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर पालकांचं ओळखपत्र आणि पत्त्याचं प्रमाणपत्र सादर करु शकता.

KYC म्हणजे Know Your Customer. बँकेला आपल्या ग्राहकाबद्दल सर्व माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळेच KYC करणे अनिवार्य आहे. यामुळे बँक आणि ग्राहक यांच्यातील व्यवहार सुलभ होतो. म्हणूनच जर SBI कडून तुम्हाला देखील Alert SMS आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब KYC Update करुन घ्या.