स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी नेहमी विविध बदल करत असते. आता एसबीआयने ATM च्या माध्यमातून होणारी चोरी रोखण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता एसबीआयने 1 जानेवारी 2020 पासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी (Cash Withdrawal) ओटीपी (OTP) अनिवार्य केला आहे. स्टेट बँकेचे डेबिट कार्ड वापरून रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत एटीएममधून पैसे काढल्यास तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येणार आहे. हा ओटीपी एटीएममध्ये टाकल्यानंतरच ग्राहकांना पैसे मिळणार आहेत. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी एसबीआयने हा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षापासून 10 हजार आणि त्यापेक्षा जास्त रक्कम एटीएममधून काढण्यासाठी ओटीपी अनिवार्य करण्यात येणार आहे.
अनेकदा चोर एटीएमच्या माध्यमातून पैसे काढतात. सध्या अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे याला आळा घालण्यासाठी बँकेना हा बदल केला आहे. स्टेट बँकेने केलेल्या एका अभ्यासानुसार, एटीएममधील 68 टक्के चोऱ्या रात्रीच्या वेळी होतात. त्यामुळे आता एसबीआय ग्राहकांना पैसे काढताना त्यांच्या मोबाईलवर ओटीपीच्या माध्यमातून एक सांकेतिक क्रमांक मिळणार आहे. ग्राहकांना हा सांकेतिक क्रमांक एटीएममध्ये टाकावा लागणार आहे. हा ओटीपी केवळ एका व्यवहारासाठी असणार आहे. दुसऱ्यांदा त्याचा वापर होणार नाही. तसेच हा ओटीपी काही मिनिटांसाठीच उपयुक्त असणार आहे. ग्राहकाने या कालावधीत व्यवहार पूर्ण केला नाही, तर तो ओटीपी निष्क्रिय होणार आहे. (हेही वाचा - Airtel Payments Bank: एअरटेल पेमेंट बँकेने सुरू केली 24x7 NEFT सेवा; सुट्टीच्या दिवशीही पैसे ट्रान्सफर करता येणार)
या व्यतिरिक्त स्टेट बँकेने एटीएममधून पैसे काढण्याच्या पद्धतीमध्ये इतर कोणतेही बदल केलेले नाहीत. विशेष म्हणजे बँकेचा हा नियम फक्त रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे यावेळेत पैसे काढणाऱ्या ग्राहकांनाच केवळ हा नियम लागू असणार आहे. हा नियम इतर बँक ग्राहकांना लागू असणार नाही.