RBI | (File Image)

चलनातून बाद झालेल्या नोटा आणि नाण्यांचा वापर करत व्यवहार करणाऱ्या नागरिकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने सावधानतेचा इशारा दिला आहे. चलनातून बाद झालेल्या नोटा व्यवहारातून बाद होतात. त्यामुळे अशा प्रकारच्या नोटांची, नाण्यांची देवाणघेवाण करुन त्याद्वारे व्यवहार करु नयेत. तसेच, अशा प्रकारे व्यवहार करणाऱ्या लोकांच्या अमिषालाही बळी पडू नये. अन्यथा आपल्याला मोठ्या आर्थिक नुकसानिचा सामना करावा लागू शकतो, अनेक लोक आरबीआय (RBI) द्वारा जुन्या नोटा चालवून अथवा बदलून देण्याचे अमिष दाखवत कमिशन घेत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. विविध प्रकारच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुन असे व्यवहार होत असल्याचे पुढे आल्यानंतर आरबीआयने हा इशारा दिला आहे.

आरबीआयने स्पष्टपणे म्हटले आहे की, आरबीआय अशा प्रकारचा कोणताही व्यवहार करत नाही. तसेच, कोणत्याही प्रकारच्या व्यवहारासाठी शुल्क आकारत नाही अथवा कमिशनही मागत नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्याही संस्था, व्यक्ती, अथवा संघटनेला आपल्या वतीने शुल्क अथवा कमिशन घेण्यासाठी नेमले नाही. जर तसा दावा कोणी करत असेल तर ते बेकायदेशीर आहे.

आरबीआयने म्हटले आहे की, दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून नागरिकांनी सतर्क राहावे. जर अशा प्रकारे कोणी अमिष दाखवत असेल तर वेळीच पोलिसांशी संपर्क करा. स्वत:ची फसवणूक होण्यापासून स्वत:ला वाचवा. आरबीआय कधीही कोणाला कमिशन अथवा शुल्क घेऊन व्यवहार करण्यासाठी नेमत नाही. (हेही वाचा, Rule Changes from 1st August: RBI चे नवे नियम 1 ऑगस्टपासून लागू; EMI आणि Salary वर होणार 'हा' परिणाम)

आरबीआय ही भारतातील सर्वात मोठी आणि मध्यवर्ती बँक आहे. ही बँक देशभरातील बँकांना पतपुरवठा करते. तसेच, सरकारी यंत्रणा, बँका आदींना कर्ज अथवा निधी पुरवठा करते. ही एक स्वतंत्र बँक आहे. जीचे भारतातील सर्व बँकांवर थेट नियंत्रण असते. ही बँक भारतातील सर्व बँकांचे व्यवहार, फायदा, नुकसान आणि पारदर्शकता अत्यंत काटेकोरपणे पाहते. भारताच्या विकासात या बँकेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.