मुंबई: खुशखबर! आजपासून BEST चा प्रवास स्वस्त, किमान बस भाडे फक्त 5 रुपये
BEST | (Image Courtesy: Archived, Edited, Symbolic Image)

BEST परिवहन मंडळाच्या नव्या निर्णयानुसार, आजपासून मुंबईकर बस प्रवाशांना किमान बसभाड्यात मोठी सूट मिळणार आहे. मुंबई पालिकेने (BMC) दिलेल्या आर्थिक निधींच्या अनुषंगाने बेस्टचे तिकीट दर कमी करण्यात आले आहे. ज्यानुसार बसच्या प्रवाशांना किमान प्रवासासाठी फक्त 5 रुपये आणि तसेच बेस्ट च्या ताफ्यात भविष्यात दाखल होणाऱ्या एसी बसच्या (AC Bus) किमान प्रवासासाठी 6 रुपये मोजावे लागणार आहेत. बेस्टने यापूर्वी प्रवास दरात कपात करण्याची महत्त्वाची घोषणा केली होती. सोमवारी राज्य सरकारने संमती दिल्यावर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली

मुंबई महापालिकेने बेस्टला सहाशे कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.  100 कोटी अनुदान देताना पालिकेने काही अटी बेस्टसमोर ठेवल्या. त्यानुसार भाडे करारावर 530 बस घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर बस भाड्यात कपात करण्याचा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने बेस्ट समितीपुढे मांडला होता. या निर्णयाला बेस्ट समिती, पालिका सभागृह तसेच राज्य परिवहन प्राधिकरणानेही नुकतीच मंजुरी दिली आहे. ही वाढ कधी अंमलात येणार याची प्रतीक्षा केली जात असतानाच सोमवारी परिवहन विभागाचे मंत्री दिवाकर रावते यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.

नवीन तिकीट दरानुसार, यापुढे साध्या बसच्या 5 कि.मी. प्रवासासाठी 5 रुपये, 10 कि.मी.साठी 10 रुपये, 15 कि.मी साठी 15 रुपये तर 15 कि.मी च्या पुढील अंतरासाठी 20 रुपये आकारण्यात येणार आहे. तर एसी बसच्या 5  कि.मी. प्रवासासाठी 6 रुपये, 10 कि.मी.साठी 13 रुपये, 15 कि.मी साठी 19 रुपये तर 15 कि.मी च्या पुढील अंतरासाठी 25 रुपये दर असणार आहे. तर साध्या बसच्या मासिक पास साठी 50 रुपये, एसी बससाठी 60 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबई: प्रतिक्षा दास होणार पहिली महिला BEST बस चालक; वयाच्या 24 व्या वर्षी बेस्ट कामगिरी

दरम्यान, बेस्टची प्रवासी संख्या सध्या प्रतिदिन 25 ते 30 लाखांपर्यंत कमी झाली आहे. ही प्रवासी संख्या 50 लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवत ,पालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या पार्श्वभूमीवर बेस्टने बसच्या संख्येत वाढ करण्याच्या निर्णयासह तिकीट दरकपातीचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.