Multi-Stage Cycle Race: जगप्रसिद्ध Tour De France च्या धर्तीवर दिल्ली-पुणे दरम्यान होणार बहुस्तरीय सायकल शर्यत; जाणून घ्या सविस्तर
सायकल | प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credit - Pixabay)

जगप्रसिद्ध ‘टूर दे फ्रान्स’च्या (Tour De France) धर्तीवर एक बहु-स्तरीय सायकल शर्यत पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये भारतात होणार आहे. शर्यतीच्या आयोजकांनी याबाबत माहिती दिली. 'हिंदयान' (Hindayan) नावाची ही शर्यत नवी दिल्लीच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून सुरु होईल. अनेक दिवसांत 1,600 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर पुण्यात तिचा समारोप होईल. कार्यक्रमाचे आयोजक डॉ. विष्णुदास चापके यांनी सांगितले की, सध्या भारतात अशी कोणताही क्रीडा स्पर्धा नाही. आशियातील सर्वात मोठी वार्षिक सायकलिंग स्पर्धा तयार करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. ही स्पर्धा अतिशय अद्वितीय असेल.

चपके हे एक माजी पत्रकार असून ते जमिनीवरून जगाची परिक्रमा करणारे पहिले भारतीय आहेत. आता 2023 मध्ये होणाऱ्या सायकल स्पर्धेत 100 सायकलस्वार सहभागी होणार आहेत. शर्यतीचा भाग म्हणून, 5 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथून 100 सायकलस्वार पेडल ऑफ करतील. यामध्ये परदेशी सायकलपटू देखील सहभागी होणार आहेत. ही मल्टीस्टेज शर्यत आग्रा, जयपूर, उदयपूर, अहमदाबाद, सुरत, मुंबई यासह अनेक शहरे आणि शहरांमध्ये थांबेल. 19 फेब्रुवारी रोजी पुण्यात ती संपेल.

ग्रामीण भागातील राष्ट्रीय महामार्गावर ही स्पर्धा होणार आहे. सामान्यत: गजबजलेल्या शहरी भागात हा कार्यक्रम गैर-स्पर्धात्मक स्वरूपात असेल, असे आयोजकांच्या निवेदनात म्हटले आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्गांवर एक लेन पूर्णपणे सायकलिंगसाठी आणि दुसरी लेन रुग्णवाहिका आणि सहायक वाहनांसाठी समर्पित असेल, असेही निवेदनात नमूद आहे. ‘हिंदयान’ हे नाव संस्कृतमधून आले असून, ‘हिंद’ ही सिंधू नदीपासून सिंधू (भारतीय) महासागरापर्यंतची जमीन आहे, तर ‘अयान’ म्हणजे मोहीम.

दरम्यान, ‘टूर डी फ्रान्स’ ही जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि सर्वात जुनी सायकलिंग शर्यत आहे. ही शर्यत प्रथम 1903 मध्ये फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर दरवर्षी तिचे आयोजन होऊ लागले. ही एक बहुस्तरीय सायकल शर्यत असून, यामध्ये 3480 किमीचे अंतर 21 टप्प्यात पार करावे लागते. (हेही वाचा:  दिल्ली ते मुंबई प्रवास अवघ्या 12 तासांत; या वर्षी पूर्ण होणार महामार्गाचा पहिला टप्पा: Nitin Gadkari)

पहिले आणि दुसरे महायुद्ध वगळता ही शर्यत सातत्याने आयोजित केली जात आहे. ही शर्यत कोणत्याही शहरातून सुरू होऊ शकते परंतु ती फक्त पॅरिसमध्येच संपते. यामध्ये प्रत्येक टप्पा पार करण्याची वेळ आधीच ठरलेली असते. जर सायकलस्वार या निर्धारित वेळेत तो टप्पा पार करू शकला नाही तर तो शर्यतीतून बाहेर पडतो.