![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2024/09/gold-ornaments.jpg?width=380&height=214)
Gold Rate Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. गुरुवारी सोने आणि चांदीच्या किमती पुन्हा वाढल्या. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 140 रुपयांनी वाढून 88,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. बुधवारी 99. 9 टक्के शुद्धता असलेल्या या मौल्यवान धातूचा भाव 87,960 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. त्याचप्रमाणे, 99. 5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव 140 रुपयांनी वाढून 87,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, जो आदल्या दिवशी 87,560 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
पीटीआयच्या वृत्तानुसार, चांदीची किंमतही 800 रुपयांनी वाढून 98,000 रुपये प्रति किलो झाली. बुधवारी चांदीचा दर 97,200 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. एमसीएक्सवरील फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचे करार 364 रुपयांनी वाढून 85,845 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीचा वायदा भाव 191 रुपयांनी वाढून 95,693 रुपये प्रति किलो झाला. (हेही वाचा -Gold Price Today: सोन्याच्या किमतीत मोठी वाढ! प्रति 10 ग्रॅम 87,210 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला दर)
सोने कधीपर्यंत महागणार?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) सौमिल गांधी यांनी सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच लागू होणाऱ्या अनेक विघटनकारी शुल्क घोषणांना प्रतिसाद म्हणून मागणी कायम राहिल्याने सोन्याच्या किमती अलीकडील नीचांकी पातळीवरून गुरुवारी परत वाढल्या. गुंतवणूकदारांना काळजी आहे की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या व्यापार शुल्कामुळे जागतिक व्यापार युद्ध भडकू शकते. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्यामध्ये जास्त प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.
तथापी, एलकेपी सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सी व्हीपी रिसर्च अॅनालिस्ट जतीन त्रिवेदी यांनी सांगितले की, यूएस सीपीआय डेटामध्ये लक्षणीय वाढ दिसून येत नसली तरी यूएस फेडरल रिझर्व्हकडून त्वरित दर कपातीची आवश्यकता नसतानाही सोन्याच्या किमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. सोन्याचे सुरक्षित आश्रयस्थान असलेले आकर्षण त्याच्या मजबूतीला पाठिंबा देते. ज्यामुळे व्यापक तेजीची भावना अबाधित राहिली.
तथापी, नजीकच्या भविष्यात सोन्याच्या किमतीत घट होण्याची शक्यता नाही. अमेरिकेच्या टॅरिफ प्लॅन आणि चीनसोबतच्या व्यापार युद्धामुळे सोन्याचे दर आणखी वाढू शकतात. तसेच, जगभरात महागाईत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होत आहे. जर महागाई कमी झाली आणि डॉलरचे मूल्य घसरले तर सोन्याचे भाव कमी होऊ शकतात.