HDFC Bank Alert: पॅन कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने होत आहे लोकांची फसवणूक; एचडीएफसी बँकेने ग्राहकांना केले सतर्क
HDFC (Photo Credit: PTI)

तुम्ही जर एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. फसवणूक टाळण्यासाठी बँक आपल्या ग्राहकांना वेळोवेळी अलर्ट पाठवत असते. अलीकडेच, बँकेने सांगितले की, आजकाल पॅन कार्डबाबत अनेक ऑनलाइन फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसीने आपल्या बँक ग्राहकांना याबाबत सतर्क केले आहे. एचडीएफसी बँकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले आहे की, त्यांच्या बँक ग्राहकांनी पॅन कार्ड तपशील अपडेट करण्यासाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.

सध्या अनेक ग्राहकांना पॅन कार्ड अपडेट करण्याबाबत खोटे एसएमएस मिळत आहेत, जे बँक तुम्हाला कधीच पाठवत नाही. आता एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना ट्विट करून खोटे एसएमएस कसे तयार केले जातात हे सांगितले आहे. बँकेने म्हटले आहे की, ‘एचडीएफसी बँक कधीही आपल्या ग्राहकांना एसएमएस संदेशाद्वारे गोपनीय माहिती सामायिक करण्यास सांगत नाही. बँक नेहमी त्यांचा अधिकृत क्रमांक 186161 किंवा HDFCBK/HDFCBN ID द्वारे संदेश पाठवते. बँकेच्या एसएमएसमधील लिंक नेहमी hdfcbk.io या अधिकृत डोमेनवरून पाठवली असते. त्यामुळे याशिवाय इतर कोणत्याही डोमेनवर किंवा लिंकवर करू नये.’

ज्याप्रमाणे बँकेने एसएमएसद्वारे गोपनीय माहिती मागण्यासाठी प्राप्त झालेल्या लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला दिला आहे, त्याचप्रमाणे अनोळखी क्रमांकावरून बँकिंग अधिकारी असल्याचे भासवून बँक खात्याचे तपशील विचारणाऱ्या लोकांकडेही दुर्लक्ष करण्यास सांगितले आहे. जर तुम्हाला असे खोटे एसएमएस किंवा कॉल्स आले तर तत्काळ बँकेला कळवा किंवा सायबर फसवणुकीबाबत तुमच्या तक्रारीसाठी तुम्ही नॅशनल क्राइम रिपोर्टिंग पोर्टलला भेट देऊ शकता. (हेही वाचा: MCLR Hike: 'या' 2 मोठ्या बँकांकडून कर्ज घेणं झालं महाग; व्याजदरात केली 20 बेसिस पॉइंट्सची वाढ)

एचडीएफसी बँकेने एका ट्विटमध्ये बँकिंग क्षेत्र नियामक आरबीआयची लिंक देखील शेअर केली आहे, ज्यामध्ये आरबीआयने फसवणूकीचे व्यवहार कसे केले जातात आणि असे फसवे व्यवहार कसे टाळता येतील हे स्पष्ट केले आहे. या लिंकमध्ये प्रत्येक प्रकारची फसवणूक कशी टाळता येईल यासह तपशीलवार माहिती दिली आहे.