प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Facebook//UIDAI)

Free Aadhaar Card Update Deadline Extended by UIDAI: युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्ड (Aadhaar Card) मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा 6 महिन्यांनी वाढवली आहे. परवा 14 डिसेंबर 2024 ही मोफत आधार अपडेट करण्याची शेवटची तारीख होती. आता ती वाढवून 14 जून 2025 करण्यात आली आहे. सरकारने ही मुदत यापूर्वीही अनेकवेळा पुढे ढकलली आहे. यापूर्वी प्रत्येकी तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली होती, तर यावेळी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. UIDAI ने सोशल मिडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

आजच्या काळात आधार हा एक महत्त्वाचा दस्तऐवज बनला आहे, ज्याचा उपयोग सरकारी योजना, बँक खाते उघडणे, रेल्वे आणि विमान तिकीट बुकिंगसह अनेक कामांमध्ये केला जातो. प्रत्येक व्यक्तीचे नाव, पत्ता, वय, लिंग आणि बायोमेट्रिक डेटा यासारखी लोकसंख्याविषयक माहिती आधार कार्डमध्ये नोंदवली जाते.

आता जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमधील नाव, पत्ता इत्यादी मोफत बदलायचे असेल, तर तुम्हाला यासाठी काहीही खर्च करण्याची गरज नाही आणि ते मोफत बदलून घेऊ शकता. आधार केंद्रांवर ऑफलाइन अपडेटसाठी शुल्क आकारले जाईल. परंतु, आधार धारक 14 जून 2025 पर्यंत MyAadhaar पोर्टलवर त्यांचे आधार मोफत अपडेट करू शकतील. याचा अर्थ आधार केंद्रावर जाऊन कोणतीही माहिती अपडेट करायची असेल तर त्यासाठी शुल्क भरावे लागेल. आधार अपडेटसाठी तुम्हाला दोन महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल, पहिले ओळखपत्र आणि दुसरा पत्ता पुरावा. (हेही वाचा: BSNL Launch 5G Mid-Next Year: बीएसएनएल पुनरागमन करण्याच्या तयारीत? पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत करणार 5G लाँच)

Free Aadhaar Card Update Deadline Extended-

असे करा आधार कार्ड अपडेट-

UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा.

मोबाईल नंबर टाकून OTP मिळवा आणि OTP टाकून लॉगिन करा.

तुमचे सर्व तपशील जसे की पत्ता इ. तपासा.

कोणतीही माहिती चुकीची असल्यास, ती बदलण्याचा पर्याय निवडा.

माहिती अपडेट करण्यासाठी, आवश्यक कागदपत्र पुरावा अपलोड करा.

यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

तुम्हाला 14 अंकी अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) नंबर मिळेल. याच्या मदतीने तुम्ही आधार अपडेटच्या प्रक्रियेचा मागोवा घेऊ शकता.