पॅन कार्ड (Photo Credits: File Photo)

पॅन कार्ड (PAN Card) हे कोणत्याही भारतीय व्यक्तीसाठी एक आवश्यक कागदपत्र आहे. आयकर विभागाकडून ते जारी केले जाते. पॅन कार्ड आर्थिक व्यवहारासाठी आवश्यक असते, म्हणूनच करदात्यांसाठी त्याचे महत्त्व आणखीन वाढते. सध्या पॅन कार्डसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो, तसेच पॅनकार्डवरील माहितीसुद्धा ऑनलाईन माध्यमातून बदलण्यास विनंती करता येते. मात्र लक्षात ठेवा, जर का एखाद्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर त्याच्याविरूद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. जास्त पॅन कार्ड असल्याची शिक्षेची तरतूद आहे.

एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन असल्यास त्याला आयकर कायदा 1961 अंतर्गत 10,000 रुपये दंड होऊ शकतो. जर का आपल्याकडे चुकून एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असल्यास, त्यापैकी एक ताबडतोब जमा करणे गरजेचे आहे. कर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एकापेक्षा जास्त पॅन जमा करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धती लागू केल्या जाऊ शकतात.

> यासाठी एनएसडीएलच्या (NSDL) संकेतस्थळावर किंवा कार्यालयावर तुम्ही जाऊ शकता. संकेतस्थळावर Request For New PAN Card Or/ And Changes Or Correction in PAN Data वर क्लिक करा आणि फॉर्म भरून तो सबमिट करा.

> आपण या फॉर्ममध्ये सुरू ठेवू इच्छित असलेल्या पॅनचा उल्लेख करा, त्यास शीर्षस्थानी ठेवा आणि उर्वरित पॅनची माहिती फॉर्ममधील आयटम क्रमांक 11 मध्ये भरा. त्याशिवाय ज्या पॅनला रद्द करायचे आहे त्याची कॉपी या फॉर्मला जोडा. (हेही वाचा: पॅन कार्ड हरवले आहे? Duplicate PAN Card मिळविण्यासाठी Online किंवा Offline असे करा अर्ज)

> काही लोक वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे पॅन तयार करतात. डीमॅट खात्यासाठी वेगळा पॅन आणि आयकर पेमेंट करण्यास व परतावा मिळवण्यासाठी वेगळा पॅन वापरतात. या व्यतिरिक्त, बरेच लोक जुने पॅन हरवल्यानंतर नव्या पॅनसाठी अर्ज करतात, त्यामुळेही त्यांच्याकडे अनेक पॅन असतात.

तर अशाप्रकारे एक पेक्षा जास्त पॅन कार्ड असल्याचे ते त्वरित जमा करणे गरजेचे आहे. दरम्यान, पॅन कार्डचा वापर सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारासाठी केला जातो. आयकर भरणे, नवीन बँक खाते उघडणे, करपात्र पगार घेणे, मालमत्ता खरेदी करणे आणि विक्री तसेच ओळखपत्र म्हणूनही पॅन कार्ड वापरले जाते.