Coronavirus in India: कोरोना व्हायरस विरोधात देशाच्या लढाईमध्ये Ravichandran Ashwin ने सुरु केले ‘हे’ चांगले काम, अशाप्रकारे करणार COVID-19 रुग्णांची मदत
रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Getty)

Coronavirus in India: भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसने (Coronavirus) पुन्हा आपले पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. मागील 24 तासांत देशात विक्रमी 3 लाखाहून अधिक कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. जगभरात एका दिवसात झालेली ही सर्वाधिक मोठी आकडेवारी आहे. यादरम्यान कोरोना व्हायरसचा सामान्य नागरिकांसह क्रिकेट आणि अन्य क्रीडापटूंना देखील फटका बसत आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) एक चांगले काम हाती घेतले आहे. यापूर्वी अश्विनने ट्विट करून देशभरातील आपल्या चाहत्यांना नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला होता तर आता तो COVID-19 ने बाधित गरजू लोकांच्या मदतीला आला आहे. (Coronavirus: देशात वाढत असलेल्या कोरोनाची क्रिकेटपटूंमध्येही दहशत, Ashwin ने दिला असा सल्ला तर पहा Harbhajan Singh काय म्हणाला)

अश्विनने सोशल मीडियावर जाहिर केले की तो आता ट्विटरद्वारे COVID-19 मदत करेल आणि यासाठी त्याने यूजर्सना सहकार्य करण्यास सांगितले. “जे कोविड रूग्णांसाठी पात्र आणि प्लाझ्मा दान करण्यास इच्छुक आहेत त्यांच्याशी कृपया या थ्रेडमध्ये आपले रक्त गट, शहर आणि क्षेत्र शेअर करावे. मी रीट्वीट करू शकतो आणि कोठे तरी जीव वाचविण्यात मदत होऊ शकते,” असं अश्विनने ट्विट केलं. अश्विनच्या ट्विटला यूजर्सकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला ज्यांनी भरभरून कमेंट बॉक्समध्ये आपल्याबद्दल माहिती दिली. यापूर्वी अश्विनने “मी आत्ता फक्त हेच सांगू शकतो !! आम्ही सर्व....खराब करत आहोत. व्हायरस अगदी माझ्या दारात आहे, तो उद्या तुमच्या दारात येऊन उभा राहील. चला प्रयत्न करू आणि सर्वोत्तम पद्धतींचे अनुसरण करूया” असं लिहीत देशभरातील लोकांना नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान, देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना अनेक राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुसरीकडे, देशभरात बुधवारी 24 तासात 3 लाख 15 हजार 478 नवीन रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रसार झाल्यापासून आतापर्यंत एकाच दिवसात आढळलेली ही केवळ भारतातील नाही तर जगभरातील सर्वाधिक संख्या आहे. यापूर्वी जगात एकाच दिवशी सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळण्याचा रेकॉर्ड अमेरिकेच्या नावावर होता. 8 जानेवारी, 2021 रोजी अमेरिकेत 3,07,570 कोरोना रुग्ण आढळले होते.