Protest against Citizenship Amendment Act (Photo Credits: IANS)

Protests Against CAA: नागरिकत्व दुरूस्ती कायदा (Citizen Amendment Act) भारतामध्ये अस्तित्त्वात आल्यानंतर देशभरातून नागरिकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केला आहे. प्रामुख्याने ईशान्य भारतातून या कायद्याला प्रखर विरोध करण्यात येत आहे. आता मात्र देशातील विविध भागातून याला विरोध  करण्यात येत आहे. 15 डिसेंबर रोजी रात्री दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया या विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलन करत रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनाचे इतके तीव्र पडसाद उमटले आहेत की हे विद्यापीठ 5 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

परंतु हे विद्यापीठच नव्हे तर इतर ठिकाणीही लोक CAA विरुद्ध आंदोलन करत आहेत. चला तर बघूया, नेमक्या कोणत्या ठिकाणी ही आंदोलनं होत आहेत.

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये 15 डिसेंबरच्या रात्रीपासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. तसेच आंदोलकांनी विद्यापीठाजवळील भागामध्ये बसेस पेटवून दिल्या. त्यानंतर पोलिसांनी विद्यापीठाच्या परिसरात घुसत अश्रुधुराचा वापर केला. तसेच पोलीस विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत असल्याचे व्हीडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अलिगढ मुस्लिम विद्यापीठ

उत्तरप्रदेश येथील अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देखील CAA विरुद्ध बंड पुकारला होता. म्हणून 15 विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण विद्यापीठ रिकामं करण्यात आलं असून सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

आसाम आणि ईशान्य भारत

नागरिकत्व दुरुस्ती कायदा याच्या विरोधात आसाम आणि ईशान्य भारतात सर्वांत मोठ्या प्रमाणावर आंदोलनं पाहायला मिळत आहेत. ईशान्य भारतात, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत एकूण 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मागील काही दिवसांपासून आसाममधील अनेक भागांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये देखील नागरिकांनी CAA विरुद्ध निषेध व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकातामध्ये काल रॅली काढली होती आणि CAA आणि NRC हे दोन्ही कायदे राज्यात लागू करू देणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला. तसेच ममता बॅनर्जी यांनी आज दुसऱ्या रॅलीचे आयोजन केले आहे.

तामिळनाडू

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (सीपीएम) यांच्याशी संलग्न असणाऱ्या एसएफआय या विद्यार्थी संघटनेने राज्यामध्ये CAA कायद्याविरुद्ध निदर्शनं केली आहेत.

देशातील इतर ठिकाणं

हैदराबाद, पाटणा, केरळ आणि लखनौ सारख्या देशातील विविध राज्यात आणि शहरांमध्ये देखील CAA ला कडाडून विरोध दर्शवण्यात येत आहे. दरम्यान, अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांनी देशातील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.