उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अलीगढमधून (Aligarh) एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी युकेजी वर्गात शिकणाऱ्या 7 वर्षांच्या मुलाला एका महिला शिक्षिकेने अतिशय क्रूर शिक्षा दिली आहे. मुलाचा दोष एवढाच होता की तो त्याची शाळेची बॅग घरीच विसरला होता. इतक्या क्षुल्लक कारणामुळे शिक्षिकेने त्याला विवस्त्र करून मारहाण केली. एवढेच नाही तर मुलाला विजेचे झटके दिले. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर आता या शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांकडून केली जात आहे.
हे संपूर्ण प्रकरण लोढा पोलीस स्टेशन परिसरातील रेडियंट स्टार इंग्लिश स्कूलचे आहे. जिथे महिला शिक्षिकेने क्रौर्याची परिसीमा ओलांडली आणि मुलाला दिली तालिबानी शिक्षा. कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी शाळेत पोहोचून गोंधळ घातला आणि या घटनेची पोलिसात तक्रार केली. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करणार असल्याची चर्चा आहे.
या घटनेबाबत मुलाचे वडील सांगतात की, सोमवारी जेव्हा मुलाचे आजोबा त्याला शाळेतून घरी घेऊन आले, तेव्हा त्याने आजोबांना सांगितले की, तो आता शाळेत जाणार नाही. त्यानंतर मुलाच्या आजोबांनी याचे कारण विचारले, मात्र त्याने काही सांगितले नाही. नंतर मुलाची आजारी आई घरी पोहोचल्यावर मुलाने या प्रकरणाची माहिती आईला दिली. मुलाचे म्हणणे ऐकून कुटुंबीयांना धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ शाळा गाठली आणि शाळेवर कारवाई करण्याची मागणी सुरू केली. (हेही वाचा: Lucknow Horror: पाचवीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, आरोपींच्या अटकेसाठी शोध कार्य सुरु)
पालकांनी शाळा बंद करण्याची मागणी करत शाळेत गोंधळ घातला, नंतर पोलिसांना फोन करून याची माहिती दिली संख्या 112. पोलीस ठाण्याचे प्रभारी राजवीर सिंग परमार पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले असता, त्यांनी तक्रार आल्यास गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शाळेच्या आवारात लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेजही स्कॅन केले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असून, चौकशीनंतर कारवाई केली जाईल, असे सांगितले.