
UIDAI कडून प्रत्येक भारतीयाला 12 अंकी एक आधार नंबर (Aadhaar Number) दिला जातो. कोणत्याही वयाचा, जाती, धर्माचा, आर्थिक स्तरातील व्यक्ती असला तरीही त्याला आधार क्रमांक दिला जातो. आधार कार्ड आणि त्यावर दिलेला आधार क्रमांक यांचा वापर सरकारी योजनांच्या सवलती मिळवण्यासाठी आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड (Aadhaar Card) हे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरलं जात असल्याने आता बॅंक अकाऊंट (Bank Account) पासून ते मोबाईल क्रमांक, रेशन कार्ड पर्यंत त्यांच लिकिंग केलं जात आहे. अनेक ठिकाणी सर्रास आपण आपलाआधार कार्ड क्रमांक देतो. त्यामुळे आपल्या आधार क्रमांकाचा वापर करून तुमची काही माहिती चोरली जाऊ शकते का? हा प्रश्न तुमच्याही मनात आला आहे का? नक्की वाचा: Aadhaar Card वरील क्रमांक खरा की खोटा तपासून पाहण्यासाठी 'या' टीप्स फॉलो करा.
पॅन कार्ड सोबत किंवा बॅंक डिटेल्स सोबत आता आधार कार्ड क्रमांक जोडलेला आहे. त्यामुळे तुमचं अकाऊंट हॅक होऊ शकतं का? असा प्रश्न तुमच्या डोक्यात आला असेल तर घाबरून जाऊ नका. कारण तसं होणार नाही. UIDAI ने सांगितलेल्या माहितीनुसार तुमचा आधार क्रमांक कुणाला मिळाला तरीही ते तुमचं अकाऊंट हॅक करू शकत नाही. जसं केवळ एटीएम कार्ड नंबर पाहून कोणी पैसे काढू शकत नाही तसंच इथे देखील आहे. ओटीपी किंवा पिन नंबर दिल्याशिवाय जसा व्यवहार केला जाऊ शकत नाही.
UIDAI दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशामध्ये एकाही ठिकाणी आधार कार्डाचा किंवा आधार क्रमांकांचा वापर करून अकाऊंट हॅक झाल्याचं, बॅंकेचे व्यवहार किंवा आर्थिक गैर व्यवहार झाल्याची नोंद झाली नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या खोट्या बातम्या फिरत असतील तर त्यावर विश्वास ठेवू नका. बॅंकिंग किंवा इतर सर्व्हिसेससाठी केवळ आधार नंबर पुरेसा नाही. खोटी अकाऊंट्स, ड्युप्लिकेट्स ओळखपत्रांच्या आधारे गैर फायदा घेणार्यांना रोखण्यासाठी आधार कार्ड मदत करणार आहे. त्यामुळे गुड गव्हर्नन्स साठी, सरकारी योजना योग्य व्यक्तींपर्यंत पोहचवण्यासाठी आता त्याचा वापर होणार आहे.