7th Pay Commission: DA आणि DR Arrears बद्दल आज निर्णय होण्याची शक्यता
Money | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

महागाई भत्ता (Dearness Allowance) आणि त्याची थकबाकी यासंदर्भात आज (शनिवार, 26 जून) केंद्राने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे. आजच्या बैठकीत यांसदर्भात निर्णय घोषित होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर (Coronavirus Pandemic) महागाई भत्त्याचे तीन हप्ते केंद्र सरकारकडून स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर थकीत हप्ते मिळणार असल्याचे सांगून कर्मचाऱ्यांना अनेकदा आश्वस्त करण्यात आले. मात्र अद्याप यासंदर्भात निर्णय न झाल्याने तब्बल 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 60 लाख पेन्शनधारक याच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे आज त्यांना गुडन्यूज मिळू शकते. (7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन फिटमेंट फॅक्टरच्या माध्यमातून 'या' पद्धतीने ठरवतात, जाणून घ्या अधिक)

अर्थ मंत्रालयाचे अधिकारी, जेसीएम (JCM) आणि कर्मचारी व प्रशिक्षण विभागाचे अधिकारी या बैठकीत महागाई भत्त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. या बैठकीचे प्रमुख कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गौबा असून अर्थ मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी व प्रशिक्षण विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल, अशी माहिती शिवगोपाल मिश्रा यांनी दिली होती. तसंच महागाई भत्ता आणि त्याची थकबाकी हा या बैठकीचा मुख्य उद्देश असेल, असेही त्यांनी सांगितले होते.

कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 असे तीन हप्ते केंद्र सरकारकडून थांबवण्यात आले होते. तसंच  1 जुलै 2021 पासून नव्याने महागाई भत्ता सुरु होईल. दरम्यान, केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा रखडलेला महागाई भत्ता आणि महागाई सवलत (डीआर) 1 जुलै 2021 पासून पुन्हा सुरू होईल, असे केंद्र सरकारने संसदेत म्हटले होते.

1 जुलैपासून डीएमध्ये वाढ झाल्यास त्या दिवसापासून तो लागू होईल. मात्र मागील कालावधीसाठी कर्मचार्‍यांना डीए वर सुधारित रक्कम मिळणार नाही.