Animals Died on Rail Tracks: भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railways) नवीन हायस्पीड गाड्यांचा समावेश होत आहे. रेल्वेचे आधुनिकीकरण केले जात आहे. तर दुसरीकडे रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. CAG (भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक) ने आपल्या ताज्या अहवालात सांगितले आहे की, गेल्या तीन वर्षात रेल्वे रुळांवर 63,000 हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे.
2017-18 आणि 2020-21 दरम्यान रेल्वे अपघातात चार आशियाई सिंह आणि 73 हत्तींनी आपला जीव गमावला आहे. या 63,345 प्राण्यांच्या मृत्यूबद्दल कॅगने चिंता व्यक्त केली आहे. खरे तर कॅगने रेल्वे अपघातांबाबतचा अहवाल गेल्या महिन्यात संसदेत मांडला होता. भारतीय रेल्वेने वन मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या सूचना आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे कॅगने म्हटले आहे. (हेही वाचा - Railway Accident: धावत्या ट्रेनमधून नदीत कोसळल्याने 18 महिन्यांच्या बाळासह आईचा मृत्यू, भंडारा येथील घटना)
कॅगने म्हटले आहे की, 2010 मध्ये, हत्तींचा समावेश असलेले रेल्वे अपघात रोखण्यासाठी पर्यावरण आणि वन मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाने एक संयुक्त सल्लागार जारी केला होता. असे असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात जनावरांचा मृत्यू चिंताजनक आहे.
एका दशकानंतरही रेल्वे अनेक विभागांमध्ये इंडिकेटर बोर्ड लावणे, कुंपण घालणे, वन कर्मचाऱ्यांची नियुक्ती आदी महत्त्वाच्या उपाययोजना राबवू शकले नाही, असे कॅगने म्हटले आहे. गीर जंगलातील आशियाई सिंहांच्या संरक्षणासाठी एसओपीचे पालन केले गेले नाही. वनविभाग आणि रेल्वेच्या दुर्लक्षामुळे मॉनिटरिंग टॉवरही बसवता आले नाहीत.
विभागीय रेल्वेच्या लेखापरीक्षण विभाग आणि अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या संयुक्त तपासणीत रेल्वे नियंत्रण कार्यालयात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या 64 टक्के जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे.