(Photo Credits: File Image)

देशाअंतर्गत दर दहा वर्षाने घेतली जाणारी जनगणना (Census 2021)  प्रक्रिया यापुढे ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. पहिल्यांदाच जनगणनेसाठी शासकीय कर्मचारी मोबाईल ऍपचा वापर करणार आहेत. यासाठीच्या सर्व टप्प्यांची सराव तालीम ऑगस्ट ते सप्टेंबर, 2019 दरम्यान देशातील निवडक जिल्ह्यांमधील ग्रामीण व शहरी भागांमध्ये होणार आहे. पुण्यातील यशदा संस्थेत 3  ते 11 जून या कालावधीत प्रशिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते. या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राच्या जनगणना संचालक रश्मी झगडे यांनी या प्रक्रियेविषयी माहिती दिली.

2021 जनगणनेसाठी वापरण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रणाली अंतर्गत नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मोबाईलवरून प्राप्त करायची आहे. यासाठी त्यांना योग्य ती भरपाई देण्यात येईल याशिवाय नेहमीच्या पद्धतीने माहिती गोळा करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे मात्र त्यांना ही प्राप्त माहिती ऑनलाईन पद्धतीनेच पोर्टलवर अपलोड करायची आहे. यासाठी तब्बल 33 लाख कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. Waterhole Census 2019: बुद्ध पौर्णिमा दिवशी प्राणी गणना का करतात? मुंबईसह महाराष्ट्रामध्ये वन्यजीव प्रेमींना ही संधी कुठे मिळते?

जनगणना आयुक्त विवेक जोशी यांनी एप्रिल 2019 मध्ये याबाबत अधिक माहिती दिली होती. ज्यानुसार जनगणना 2021 मध्ये प्रथमच माहितीचे संकलन ऑनलाइन पद्धतीने करण्याचे प्रस्तावित असून, त्याची चाचणी घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. ज्यात प्रथम टप्प्यात घरांची गणना करण्यात येईल यासाठी संबंधित राज्यांनी एप्रिल ते सप्टेंबर 2019 दरम्यान दोन महिन्यांचा कालावधी निश्चित करायचा आहे, यांनतर दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी- मार्च 2021 दरम्यान देशातील रहिवाश्यांची गणना पार पडेल. माहितीचे संकलन ऑनलाइन पद्धतीने झाल्यास शासकीय धोरण ठरविण्यासाठी त्याचा उपयोग होईल, तसेच संशोधकांनाही आवश्यक तेव्हा जनगणनेची माहिती उपलब्ध होईल. जनगणना चाचणीचे प्रत्येक टप्प्यात बिनचूक काम झाल्यास प्रश्नावली, सूचना पुस्तिका, माहिती संकलनाची पद्धत सुनिश्चित करणे शक्य होणार आहे.