भारतीय किसान युनियनचे नेते Rakesh Tikait यांना जीवे मारण्याचे धमकी, पोलीस तपास सुरू
Rakesh Tikait (Photo Credits: PTI/File)

भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते (National Spokesperson of Bharatiya Kisan Union) राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांना फोनद्वारे जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांसह उत्तर प्रदेश पोलिसांनीही कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र, या प्रकारामुळे शेतकरी संघटनांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप पाहायला मिळत आहे. राकेश टिकैत यांना याआधीही अनेकदा जीवी मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ज्यामुळे गाझियाबाद पोलीसात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे, राकेश टिकैत हे केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्याविरोधात गेल्या 6 महिन्यांपासून दिल्ली- उत्तर प्रदेशच्या गाजीपूर सीमेवर आंदोलन करत आहेत.

राकेश टिकैत यांना वेगवेगळ्या फोन नंबरवरुन धमकीचे फोन येत आहेत. तसेच त्यांना अश्लील मेसेजही येत आहेत. या मेसेजमध्ये त्यांच्याकडून 11 हजार रुपयांची मागणी देखील केली जात आहे. याप्रकरणी टिकैत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांसह उत्तर प्रदेश पोलीसही तपासाला लागले आहेत. तसेच राकेश टिकैत यांच्याकडे केवळ 11 हजारांची मागणी का केली जात आहे, याबाबातही पोलिसांना आश्चर्य वाचत आहे. हे देखील वाचा- Asaram Bapu: आसाराम बापू याचा मुक्कम तुरुंगातच! बरे होताच कारागृहात हजर करण्याचे कोर्टाचे आदेश, जामीन याचिकाही फेटाळली

भारतीय किसान युनियनचे संघटन जिल्हा प्रभारी जय कुमार यांनी राकेश टिकैत यांना दिलेल्या धमकीसंदर्भात गाझियाबादच्या कौशांबी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुसरीकडे, गाझियाबादचे पोलिस अधीक्षक नगर द्वितीय ज्ञानेंद्र सिंह म्हणाले की, तक्रार दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. याआधी भारतीय शेतकरी नेते राकेश टिकैत यांना फोनवर दोनदा धमक्या मिळाल्या आहेत. पहिल्यांदा धमकावणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीला बिहारमध्ये अटक करण्यात आली होती. तर, दुसऱ्या वेळेस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा अजूनही तपास सुरु आहे. तसेच राकेश टिकैत यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेलेली ही तिसरी घटना आहे.