PM Inaugurates Nalanda University Campus: पंतप्रधान मोदींच्या हस्ते नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन; 800 वर्षांनंतर परतले वैभव
PM Inaugurates Nalanda University Campus (PC - ANI)

PM Inaugurates Nalanda University Campus: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी बिहार दौऱ्यावर असताना नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन (PM Modi Inaugurates Nalanda University Campus) केले. बिहारमधील राजगीर येथे नवीन कॅम्पसचे उद्घाटन झाल्यानंतर तब्बल 800 वर्षांनंतर या विद्यापीठाचे वैभव परत आले आहे. या शुभ प्रसंगी पंतप्रधान मोदींसोबत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि 17 देशांचे राजदूत, संसदीय कामकाज मंत्री विजय चौधरी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हेही उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पहिल्या 10 दिवसात मला नालंदा येथे जाण्याची संधी मिळाली आहे. हे माझे सौभाग्य आहे, मी याकडे भारताच्या विकासाच्या प्रवासासाठी एक चांगली संधी म्हणून पाहतो. नालंदा हे केवळ नाव नाही. नालंदा ही एक ओळख, एक सन्मान, एक मूल्य, एक मंत्र, एक अभिमान, एक कथा आहे. नालंदा ही सत्याची घोषणा आहे. अग्नीच्या ज्वाळांमध्ये पुस्तके जळू शकतात. परंतु, अग्नीच्या ज्वाला ज्ञानाचा नाश करू शकत नाहीत. नालंदाच्या विध्वंसाने भारत अंधाराने भरून गेला होता. आता त्याच्या जीर्णोद्धारामुळे भारताच्या सुवर्णयुगाची सुरुवात होणार आहे, असंही मोदी यांवेळी म्हणाले.

नालंदाच्या पुनर्जागरणामुळे भारताची क्षमता जगासमोर येईल - पंतप्रधान मोदी

नालंदाचा नवीन परिसर भारताच्या संभाव्यतेची ओळख जगाला करेल. नालंदा सांगेल की जी राष्ट्रे मजबूत मानवी मूल्यांवर उभी आहेत त्यांना राष्ट्रीय इतिहासाचे पुनरुज्जीवन करून चांगल्या भविष्याचा पाया कसा रचायचा हे माहित आहे. नालंदा हे केवळ भारताच्या भूतकाळाचे पुनर्जागरण नाही. जगातील आणि आशियातील अनेक देशांचा वारसा त्याच्याशी निगडीत आहे, असंही मोदींनी यावेळी नमूद केलं. (हेही वाचा -PM Modi in Varanasi: विजयानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदा काशी विश्वनाथ धामला पोहोचले, विधीपूर्वक केली भगवान भोलेनाथांची पूजा)

भारताच्या परंपरा आणि अस्मितेचे जिवंत केंद्र - पंतप्रधान नरेंद्र मोदी

नालंदा हे भारताच्या परंपरा आणि अस्मितेचे एक चैतन्यशील केंद्र होते. हे आपल्या सर्वांना माहीत आहे. ही भारताची शिक्षणाबाबतची विचारसरणी आहे. शिक्षण आपल्याला घडवते, कल्पना देते आणि आकार देते. प्राचीन नालंदामध्ये, मुलांना त्यांच्या ओळख किंवा राष्ट्रीयत्वाच्या आधारावर प्रवेश दिला जात नव्हता. प्रत्येक देशातून आणि प्रत्येक वर्गातील तरुण येथे शिक्षणासाठी येत असत. नालंदा विद्यापीठाच्या या नवीन कॅम्पसमध्ये आपल्याला तीच प्राचीन प्रणाली पुन्हा आधुनिक स्वरूपात बळकट करायची आहे. येथे आज जगातील अनेक देशांतून अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 20 हून अधिक देशांतील विद्यार्थी नालंदामध्ये शिक्षण घेत आहेत, असंही मोदी यांनी यावेळी नमूद केलं.

पहा व्हिडिओ - 

नालंदा विद्यापीठातील सुविधा - 

आंतरराष्ट्रीय नालंदा विद्यापीठ, राजगीरच्या नवीन कॅम्पसमध्ये एकूण 24 मोठ्या इमारती आहेत. कॅम्पसमध्ये दोन शैक्षणिक ब्लॉक असून प्रत्येकी 40 वर्गखोल्या आहेत, एकूण आसन क्षमता अंदाजे 1900 आहे. यात 300 आसनक्षमतेची दोन सभागृहे आहेत. यात सुमारे 550 विद्यार्थ्यांची क्षमता असलेले विद्यार्थी वसतिगृह आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय केंद्र, 2000 लोकांपर्यंत क्षमता असलेले ॲम्फी थिएटर, एक फॅकल्टी क्लब आणि क्रीडा संकुल यासह इतर अनेक सुविधा आहेत.