तिनही सैन्य दलांच्या पत्रकार परिषदेमध्ये सादर केले पाकिस्तानच्या खोटेपणाचे पुरावे; आता पाकच्या कोणत्याही हल्ल्याचे उत्तर देण्यास तयार
पाकिस्तानी विमानाचे अवशेष (Photo Credits: ANI)

पुलवामा हल्ल्यानंतर, भारताने सर्जिकल स्ट्राईकद्वारे काश्मीरव्याप्त पाकिस्तानमध्ये शिरून दहशतवादी तळ नष्ट केला. त्यानंतर चिडलेला पाकिस्तान आणि भारत यांमध्ये चकमकी सुरु झाल्या. 27 तारखेला पाकिस्तानची विमाने भारताच्या हद्दीत शिरली होती, या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढला. या पार्श्वभूमीवर भारताच्या तिनही सैन्य दलांच्या वतीने (लष्कर, हवाई दल आणि नौदल) आज (गुरुवारी) सायंकाळी 7 वाजता संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये लष्कराच्यावतीने मेजर जनरल सुरेंद्र सिंह महल, हवाई दलाच्यावतीने एअर व्हाईस मार्शल आरजीके कपूर आणि नौदलाच्यावतीने रिअर अॅडमिरल डीएस गुजराल यांनी पत्रकांरांना संबोधित केले. पाकिस्तानने कोणत्याही प्रकारचा हल्ला केल्यास, आम्ही पाकिस्तानला उत्तर देण्यास पूर्णपणे तयार असल्याचे तीनही दलांनी सांगितले. तसेच या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानने वापर केलेल्या एफ-16 (F-16) या विमानाचे अवशेष पुरावे म्हणून सादर केले गेले.

पाकिस्तानचा लष्करी तळांवर हल्ला करण्याचाच हेतू होता हे सिद्ध झाले आहे. म्हणून, ‘आमची लढाई ही दहशतवादाशी आहे, त्यामुळे जोपर्यंत दहशतवादी तळ निर्माण होतील तोपर्यंत आम्ही हल्ला करू, असा इशारा यावेळी लष्कराने दिला. या परिषदेमध्ये पाकिस्तानकडून केल्या गेलेल्या उल्लंघनाचा उल्लेख करण्यात आला. भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सुंदरबनी, भिंबर, नौशेरा, कृष्णाघाटी भागात गोळीबार केला. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी लढाऊ विमानांनी लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा हल्ला परतवून लावण्यात आला. 2 दिवसात पाकिस्तानने 35 वेळा सीझफायरचे उल्लंघन केले आहे. (हेही वाचा: पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय पायलट अभिनंदन यांची उद्या होणार सुटका: इम्रान खान)

27 फेब्रुवारीच्या हल्ल्यासाठी पाकिस्तानने एफ-16 या विमानांचा वापर केला. मात्र पाकिस्तानकडून ही गोष्ट अमान्य करण्यात आली होती. मात्र, आजच्या पत्रकार परिषदेमध्ये या विमानाचे अवशेष दाखवण्यात आले, त्यामुळे पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्याच्या ताब्यात असलेला विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची शुक्रवारी सुटका करणार असल्याचे जाहीर केल्यामुळे परिस्थिती बदलली आहे. त्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद महत्त्वाची मानली जात आहे.