चीनमधील (China) वुहान (Wuhan) शहरात गेल्या महिन्याभरापासून थैमान घातले असून आतापर्यंत 1000 हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) अनेक लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच हैदराबाद (Hyderabad) येथील घटनेने सर्वांचे लक्ष केंद्रीत करून घेतले आहे. व्हायरल फिव्हरला (Viral Fever) कोरोना व्हायरसचा ताप समजून एका 50 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना हैदराबाद येथील चित्तूर (Chittur) येथे घडली. आपल्याला कोरोना व्हायरस झाला असून आपली पत्नी आणि मुलांमध्ये कोरोनाचे संक्रमण होऊ नये, यासाठी संबंधित व्यक्तीने घराजवळील स्मशानभूमीतील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
चीनमधील वुहान शहरात गेल्या महिन्याभरापासून थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने अक्षरश: लोकांना हैराण केले आहे. चीनच्या वुहान येथे 30 डिसेंबर 2019मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. यातच हैदराबाद येथील रहिवाशी कृष्णा यांनी कोरोना व्हायरस संबंधित एक व्हिडिओ पाहिला होता. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना अशक्तपणा जाणवू लागला. आपल्यालाही कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याचे कृष्णा यांना वाटले. तसेच घरातील सदस्यांना या व्हायरसची लागण होऊ नये, या नैराश्यातून कृष्णा यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबियांना घरात बंद करून घराजळील स्मशानातील आपल्या आईच्या कबरीजवळ असलेल्या एका झाडावर गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: चीनमध्ये कोरोना व्हायरस ने घेतला 1000 च्या वर लोकांचा बळी; तर 40,000 हून अधिक या गंभीर आजाराच्या विळख्यात
दरम्यान, कृष्णा यांचे शरिर जवळच्या रूग्णालयात पाठवण्यात आले त्यावेळी त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. कृष्णा यांच्या शरिरात कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षणे आढळून आली नसून त्यांना केवळ व्हायरल फिव्हर झाला होता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. मात्र, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलू नये, असे आवाहनही केले आहे.