Coronavirus: चीनमध्ये कोरोना व्हायरस ने घेतला 1000 च्या वर लोकांचा बळी; तर 40,000 हून अधिक या गंभीर आजाराच्या विळख्यात
Coronavirus (Photo Credits: IANS)

चीनमधील वुहान (Wuhan) शहरात ठाण मांडून बसलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) आतापर्यंत 1000 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे तर 40,000 हून अधिक लोकांना या गंभीर आजाराची लागण झाली आहे अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये 1016 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 40,000 पेक्षा अधिक लोकांना कोरोनाचे संक्रमण झाल्याचे समोर आले आहे. नॅशनल हेल्थ कमिशनने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कोरोनामुळे आणकी 97 लोकांचा मृत्यू झाला असून त्यातील 91 लोक हुबेई येथील होते.

चीनमधील वुहान शहरात गेल्या महिन्याभरापासून थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने अक्षरश: लोकांना हैराण केले आहे. चीनच्या वुहान येथे 30 डिसेंबर 2019मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. स्थानिक मासळी बाजारातून सात रुग्ण आले होते. या रुग्णांना आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते. त्यांनी या आजाराचं निरिक्षण केल्यानंतर हा कोरोना व्हायरस असल्याचं त्यांना आढळून आलं. गेल्या महिन्याभरापासून चीनमध्ये या आजाराने आतापर्यंत हजाराहून अधिक जणांचे बळी घेतले आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये तब्बल 24 हजार जणांचा मृत्यू झाल्याचा दावा तैवानच्या एका वृत्तसंस्थेने केला आहे. चीन मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

कोरोना व्हायरसची लक्षणे:

हे एका विषाणूच्या समूहाचे नाव आहे. सध्या सर्दी, खोकल्यापासून ते गंभीर आजारासाठी हे विषाणू कारणीभूत असतात. सर्वसाधारणपणे हवेवाटे, शिकण्यातून, खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातून हा आजार जडला जातो. Coronavirus: चीनमध्ये कोरोना व्हायरस, भारतातील औषधांच्या किमती वाढण्याची शक्यता

काय कराल उपाययोजना:

प्रत्येकांनी आपला हात वारंवार आणि स्वच्छ धुवावे. शिंकताना, खोकताना नाका तोंडावर रुमाल किंवा टिश्यू पेपर धरावे. अर्धवट शिजवलेले कच्चे मांस खाऊ नये. श्वसनसंस्थेचे विकास असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क ठेवताना न होण्याची काळजी घ्यावी.

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर मुंबई महानगर पालिकेने चिचंपोकळीतील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. या कक्षामध्ये कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांची तपासणी केली जात असून इथेच त्याच्यावर उपचारही करण्यात येणार आहेत, असे मुंबई महानगर पालिकेच्या कार्यकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.