हरयाणात मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांच्या नेतृत्वाखाली भाजपला जननायक जनता पार्टीने (जेजेपी) जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे आता भाजपचे मनोहर लाल खट्टर यांचा रविवारी मुख्यमंत्री म्हणून, तर दुष्यंत चौटाला यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी खट्टर यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. (हेही वाचा - हरियाणा विधानसभा निवडणूक 2019: भूपेंद्र सिंह हुड्डा, दुष्यंत चौटाला, मनोहर लाल खट्टर यांच्यासह पहा 288 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी)
खट्टर हरयाणाचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतील. तसेच जननायक जनता पार्टीचे नेते दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ ग्रहण करणार आहेत. दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जेजेपीचे समर्थन मिळाल्यानंतर मनोहरलाल खट्टर यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी दावा दाखल केला होता. त्यावर राज्यपालांनी त्यांना लगेचच सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. रविवारी दुपारी 2.15 वाजता आमच्या सरकारचा शपथविधी होईल, असं खट्टर यांनी सांगितले.
भाजपाचे 40, जेजेपीचे 10 आणि 7 अपक्षांनी सरकार स्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे केला. राज्यपालांनी खट्टर यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. खट्टर हे सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होत आहेत. तसेच दुष्यंत यांच्या मातोश्री नयना चौटाला या राज्याच्या उपमुख्यमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगळी होती. परंतु, त्यांच्याऐवजी दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.